Ashok Kharat : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ! सुनावणीवेळी नेमकं काय घडलं? पाहा…
तपास पूर्ण झाला असून पोलीस कोठडी वाढवण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही, असा दावाही त्यांनी केला.

Ashok Kharat – बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्वयंघोषित बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत नाशिक येथील एका न्यायालयाने रविवारी १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. बलात्काराच्या आरोपानंतर १८ मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली होती.
शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी आठ गुन्हे कथित लैंगिक अत्याचार किंवा शोषणाशी संबंधित आहेत, तर दोन गुन्हे फसवणुकीचे आहेत.
खरातविरुद्ध तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) गेल्या काही दिवसांत दूरध्वनीद्वारे १०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील बहुतांश तक्रारी महिलांनी केल्या आहेत.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर रविवारी खरातला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने खरातला काही तक्रार आहे का?, असे विचारले, त्यावर त्याने कोणतीही तक्रार नसल्याचे उत्तर दिले.
तसेच, आरोपीच्या मोबाईल फोनमधील डेटाची तपासणी करण्यात आली असून, त्याचा क्लोन रिपोर्ट (प्रतिकृती अहवाल) प्राप्त झाला आहे. आरोपीने आपल्या संपर्कातील व्यक्तींची नावे, विशेषतः राजकीय नेत्यांची नावे काही बनावट नावांनी (डमी आयडेंटिटीज) सेव्ह करून ठेवली होती का?, याचा तपास होणे बाकी आहे.
तसेच अनेक डिजिटल पुराव्यांची पडताळणी होणेही अजून बाकी आहे, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तपास पथकाचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनीही न्यायालयाला आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाची माहिती दिली आणि खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.
मात्र, बचाव पक्षाचे वकील सचिन भाटे यांनी नमूद केले की, एसआयटीकडून तीच कारणे दिली जात आहेत, जी मागील सुनावणीदरम्यान पोलीस कोठडी मिळवण्यासाठी दिली होती. एसआयटीने आतापर्यंतच्या तपासात नेमके काय केले आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच, तपास पूर्ण झाला असून पोलीस कोठडी वाढवण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही, असा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे, एका पीडित व्यक्तीचे वकील एम. वाय. काळे यांनीही खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याच्या सरकारी पक्षाच्या मागणीचे समर्थन केले.






