Ashok Kharat : अशोक खरातचे पाय खोलात; पाचव्या गुन्ह्यात २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Ashok Kharat nashik, court : अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणावर दररोज नवे हादरवणारे खुलासे समोर येत आहे. महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक, जमीन व्यवहार फसवणुकीची त्याची अनेक प्रकरणे समोर आली.
रोज काही ना काही नवी माहिती समोर येत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होते. सत्ताधारी पक्षातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो समोर आले. यानंतर आता अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर, खरातला आज न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
न्यायालयात काय घडलं?
सुरक्षेखातर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजची सुनावणी पार पडली. “आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत एक असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे पदार्थ पाजून आणि फसवणूक करून त्याने अत्याचार केले आहेत. या द्रव्यांचा आणि गुन्ह्यामागच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे,” असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
तर आरोपीच्या वकिलांनी कोठडीला विरोध करत, द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. मात्र, पीडितांची संख्या आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने कोठडी मंजूर केली.
हेही वाचा:
Anjali Damania : मंत्रिमंडळात महिला किती? अंजली दमानियांनी आकडेवारीसह केली सरकारची कानउघडणी






