Ashok Kharat : अशोक खरात विरोधात ईडीकडून दोषारोपपत्र दाखल
अंमलबजावणी संचालनालयाने स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगणाऱ्या महाराष्ट्रातील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat), त्याची पत्नी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

Ashok Kharat : अंमलबजावणी संचालनालयाने स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगणाऱ्या महाराष्ट्रातील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat), त्याची पत्नी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. खरातने दोन सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून फसवणुकीचा पैसा पांढरा केल्याचा आरोप ईडीने केला आहे.
मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात शुक्रवारी हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये अशोककुमार एकनाथ खरात, त्याची पत्नी कल्पना आणि इतर चार जणांना आरोपी करण्यात आले आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या खरातला १९ मे रोजी ईडीने अटक केली होती.
नाशिकस्थित खरात (Ashok Kharat) हा लोकांना स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचे आणि तो भगवान शिवाचा अवतार असल्याचे सांगून फसवणूक करायचा. आजार बरे करणे, संकटे निवारणे आणि व्यवसायात समृद्धी आणण्याच्या बहाण्याने अवतार पूजा करून त्याने भाविकांकडून कोट्यवधी रुपये आणि मालमत्ता उकळल्याचा आरोप आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, खरातने गुन्ह्यातून मिळालेला पैसा दोन सहकारी पतसंस्थांमधील एका कर्मचाऱ्याच्या संगनमताने अनेक खात्यांद्वारे आणि बेनामी खात्यांमध्ये रोख रकमा जमा करून पांढरा केला. हा पैसा त्याने त्याचे नातेवाईक आणि विश्वासू साथीदारांच्या नावावर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे आणि मुंबईत स्थावर मालमत्तेत गुंतवला.
खरात (Ashok Kharat) सध्या न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये आहे. ईडीने या प्रकरणात आतापर्यंत तब्बल ३६.९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एका विवाहित महिलेने खरातवर तीन वर्षे सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर, १८ मार्च रोजी नाशिक पोलिसांनी त्याला सर्वप्रथम अटक केली होती.






