Ashok Kharat Case : अशोक खरातसोबतच्या ‘त्या’ व्हिडिओतल्या अनेक महिला नैराश्यात; मानसोपचार तज्ज्ञांकडे घेतली धाव
Ashok Kharat Case :

Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. त्याच्यासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सुमारे 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेतली असून काही महिलांनी उपचारही सुरू केले आहेत. सततचा तणाव, भीती आणि समाजात ओळख उघड झाल्यामुळे अनेक महिला नैराश्याच्या गर्तेत सापडल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात कार्यालय चालवत अशोक खरात याने भोंदूगिरीच्या नावाखाली शेकडो महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये पीडित महिलांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे त्यांची ओळख उघड झाली.
पोलिसांचा इशारा दुर्लक्षित
पोलीस प्रशासनाने अशा व्हिडिओंचे शेअरिंग किंवा संग्रह करणे गुन्हा असल्याचा इशारा दिला होता. तरीही काही ठिकाणी हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. सायबर पोलिसांनी अनेक व्हिडिओ हटवले असले, तरी तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं.





