अशोक चव्हाणांच्या साम्राज्याला नांदेडमधूनच हादरे

नांदेड-दक्षिण (87)

शंकरराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यात कॉंग्रेस चांगलीच रुजली. पण, विशेषत: 2014 च्या निवडणुकीपासून अशोक चव्हाणांना स्वकीयांपासूनच शह मिळू लागला आहे. त्यामुळे चव्हाण कुटुंबीयांची मक्‍तेदारी असलेल्या नांदेड जिल्ह्यातूनच कॉंग्रेस हळूहळू संपत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही तशीच स्थिती आहे. एकेकाळी या दोन्ही पक्षांमधील मातब्बर घराणी आता भाजप-शिवसेनेमध्ये असून त्यांना पुरेसा जनाधार आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर अशोक चव्हाण आता “लोकसंवाद’ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण, कॉंग्रेसची ती मुख्य गरज आहे.

नांदेड शहरात विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यात नांदेड दक्षिण हा मतदारसंघ म्हणजे अर्ध नांदेड शहर, सिडको-हडको आणि ग्रामीणचा काही भाग मिळून बनलेला आहे. या मतदारसंघात मुस्लिम, मराठा आणि दलित मतदार निर्णायक संख्येने आहेत. त्यामुळे वंचित आघाडी, एमआयएमकडून लढण्यासाठी येथून अनेकजण उत्सुक आहेत.

2009 ला आस्तित्वात आलेला नांदेड मधला हा मतदारसंघ. या मतदार संघात 2009 साली कॉंग्रेसकडून ओमप्रकाश पोकर्णा विजयी झाले होते. आता ते भाजपमध्ये आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकांची मते घेतली होती. त्याच हेमंत पाटील यांनी 2014 साली अगदी थोड्या फरकाने ही जागा जिंकली. भाजपच्या दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव करत हेमंत पाटील विधानसभेत पोहोचले. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी शेजारच्या हिंगोलीमधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यामुळे पाटील यांच्याऐवजी कोण उमेदवार असेल, असा प्रश्‍न आहे. पण, युतीच्या गणितांमध्ये हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल, त्यावरही बरेच अवलंबून असेल. तर, कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेत लोकसभा लढवली. त्यात ते विजयीदेखील झाले. त्यांचं आणि अशोक चव्हाणांचे हाडवैर जगजाहीर आहे. त्यामुळे चव्हाणांना आणखी हादरे देण्यासाठी हा मतदारसंघ ते भाजपकडे खेचून स्वतःचे मेहुणे श्‍यामसुंदर शिंदे यांना उमेदवारी मिळवून देऊ शकतात. नांदेड दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेसला यापूर्वी बऱ्याचदा मताधिक्‍य मिळालं आहे. पण, विकासाच्या बाबतीत महानगरपालिका, आमदार आणि खासदार यांनी या भागाची उपेक्षा केली आहे. त्यामुळे लोक नाराज आहेत. पण, शेवटी जातीय गणिते आणि कॉंग्रेसकडे लोक पुन्हा आकर्षित झाले, तर या मतदारसंघात चमत्काराची आशा अजूनही अशोक चव्हाणांना आहे.

मूळ समस्यांवर उपाय नाहीच
नांदेड महानगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आहे, मात्र नांदेडचे अंतर्गत रस्ते हे एखाद्या खेड्यातील रस्त्यांना लाजवतील असेच आहेत. त्याला सर्वस्वी मनपा जवाबदार आहे. पण त्याचा रोष आमदार- खासदारावर जातोय. उद्योगांच्या बाबतीत नांदेड पिछाडीवर आहे. एकेकाळी नांदेडचं वैभव असणारी टेक्‍सटाइल मिल अद्याप बंदच आहे. इतरही छोटे-मोठे उद्योग बंद पडलेले आहेत. एमआयडीसीकडे कोणी फिरकतही नाही. शिक्षणाच्या बाबतीत नांदेड सुधारलं असलं, तरी इथल्या बेरोजगारांना पुणे-मुंबईच गाठावी लागते. रोज 120 हून अधिक खाजगी बसेस पुण्याला ये-जा करतात यावरुन या स्थितीचा अंदाज येईल. दुधाचे उत्पादन मुबलक असूनही नांदेडकर सोलापूर, नगरवर अवलंबून आहेत. गोदावरी नदी प्रदूषण थोडंही कमी झालेलं नाही. समस्यांचं माहेरघर म्हणजे नांदेड शहर आहे आणि येथील लोक कमालीचे सोशिक आहेत. पण, त्याचं उत्तर त्यांनी लोकसभेवेळी दिलं असून वर्षानुवर्षे सत्ता असूनही विकासाच्या गप्पा करणाऱ्या अशोक चव्हाणांना घरी बसवलं आहे.

हेमंत पाटील, शिवसेना  45,836
दिलीप कंदकुर्ते, भाजप  42,629
मोईन मुख्तार, एमआयएम  34,590
ओमप्रकाश पोकर्णा, कॉंग्रेस  31,762

Leave A Reply

Your email address will not be published.