नांदेड : काँग्रेसची अवस्था ही नात्यागोत्याचा पक्ष असल्यासारखी झाली आहे. काँग्रेसकडे प्रेरणा देण्यासारखं काम नाही, रोड मॅप तयार करावा लागतो असे म्हणताना भाजपचे खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला आरसा दाखवला. दिवंगत वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसुनेने सांगलीत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून लवकरच त्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्याच अनुषंगाने अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मी देखील काँगेसमध्येच होतो. त्याकाळात विकास झाला नाही का? झाला मात्र, त्यापेक्षा दुप्पट वेगाने विकास मागील 11 वर्षांच्या कालावधीमध्ये झाला. जो गतीवान आहे. आजचा आयपीएलचा जमाना आहे. त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र बनविण्याचे धोरण ठेवले असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.