Ashmita Wins Title : अश्मिता चालिहाने पटकावलं पहिलं BWF वर्ल्ड टूर जेतेपद! कोरिया मास्टर्सच्या फायनलमध्ये चिनी खेळाडूला चारली धूळ
Ashmita Wins Title : भारताची २६ वर्षीय स्टार बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहाने प्रतिष्ठेच्या 'कोरिया मास्टर्स सुपर ३००' बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

Ashmita Chaliha Wins Korea Masters 2026 Title Womens Singles : वर्ष २०२६ हे भारतीय महिला बॅडमिंटनपटूंसाठी सुवर्णकाळ ठरत असून, आता यात आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. भारताची २६ वर्षीय स्टार बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा (Ashmita Chaliha) हिने प्रतिष्ठेच्या ‘कोरिया मास्टर्स सुपर ३००’ (Korea Masters 2026) बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अश्मिताच्या कारकिर्दीतील हे पहिलेवहिले ‘बीडब्ल्यूएफ (BWF) वर्ल्ड टूर’ विजेतेपद ठरले आहे. अंतिम सामन्यात तिने चीनच्या चौथी मानांकित खेळाडू हान कियान शी हिचा पराभव केला.
पहिला सेट गमावून ५३ मिनिटांत थरारक पुनरागमन!
तीन सेटपर्यंत चाललेल्या या अतिशय चुरशीच्या सामन्यात अश्मिताची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या सेटमध्ये तिला चीनच्या हान कियान शी विरुद्ध १४-२१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर अश्मिताने अप्रतिम चपळाई दाखवत सामन्याचे चित्रच पालटले. तिने जबरदस्त स्मॅश आणि आक्रमक खेळाच्या जोरावर दुसरा सेट २१-१४ अशा फरकाने जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये तिने चिनी खेळाडूला कोणतीही संधी न देता २१-१४ ने बाजी मारली आणि ५३ मिनिटांत सामना खिशात घातला.
“या विजेतेपदाने माझी भूक आणखी वाढवली आहे!”
Ashmita Chaliha 🇮🇳 and Han Qian Xi 🇨🇳 clash for the title.#BWFWorldTour #KoreaMasters2026 pic.twitter.com/PP94HechlM
— BWF (@bwfmedia) August 9, 2026
ऐतिहासिक जेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना अश्मिता म्हणाली, “हा विजय माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. या विजेतेपदाने भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्याची माझी भूक वाढवली आहे. पहिल्या गेममध्ये कोर्टवरील हवेच्या प्रवाहामुळे (Drift) थोडी अडचण आली होती, पण दुसऱ्या गेममध्ये मी रणनीती बदलली आणि आक्रमक खेळ करून पुनरागमन केले.”
यंदाच्या वर्षात तन्वी शर्माने तायपै ओपन, पी. व्ही. सिंधूने जपान ओपन आणि देविका सिहागने थायलंड मास्टर्स जिंकल्यानंतर आता अश्मिताने मिळवलेले हे यश भारतीय बॅडमिंटनचे जागतिक स्तरावरील वर्चस्व सिद्ध करणारे आहे.





