Rahane Jaiswal Ban : “मी बाहेर काढले नसते तर त्याच्यावर ४ सामन्यांची बंदी आली असती!”; रहाणेचा जैस्वालच्या ‘त्या’ वादावर मोठा खुलासा
Rahane Jaiswal Ban : यशस्वी जैस्वालसोबतच्या (Yashasvi Jaiswal) गाजलेल्या वादावर अखेर मौन सोडले आहे. त्या सामन्यात रहाणेने भर मैदानातून यशस्वीला मैदानाबाहेर हाकलले होते.

Ajinkya Rahane Reveals Yashasvi Jaiswal Sledging Controversy : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने २०२२ च्या दुलीप करंडक फायनलमधील यशस्वी जैस्वालसोबतच्या (Yashasvi Jaiswal) गाजलेल्या वादावर अखेर मौन सोडले आहे. त्या सामन्यात रहाणेने भर मैदानातून यशस्वीला मैदानाबाहेर हाकलले होते. आता ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रहाणेने खुलासा केला आहे की, जर त्याने यशस्वीला मैदानाबाहेर पाठवले नसते, तर त्याच्यावर ४ सामन्यांची मोठी बंदी लादली गेली असती.
नेमके काय घडले होते मैदानावर?
२०२२ मध्ये वेस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यात दुलीप करंडकाचा अंतिम सामना रंगला होता. वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणे होता. सामन्यादरम्यान यशस्वी जैस्वाल साऊथ झोनचा फलंदाज टी. रवी तेजा याला सातत्याने स्लेज (Sledging) करत होता. पंचानी अनेकदा ताकीद देऊनही यशस्वी ऐकत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रहाणेने स्वतःच्याच संघातील खेळाडू यशस्वीला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले.
सामना रेफरीने माझ्यासमोरच फाडली बंदीची चिट्ठी!
Ajinkya Rahane sends Yashasvi Jaiswal off the field after consistently sledging the batsman…
Good to see Jaiswal back in the field, after knowing his mistake, good from Captain Rahane.#rahane #Cricket #Trending pic.twitter.com/GvnIgBpaZW
— Ankit | AI , Tech & News (@Ankityadav_360) September 25, 2022
रहाणेने सांगितले, “त्या वेळी दोन्ही खेळाडू आपला ताबा गमावत होते. मॅच रेफरी ४ सामन्यांच्या बंदीची चिट्ठी लिहून तयार होते. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘ही चिट्ठी तयार आहे, पण तुम्ही जे पाऊल उचलले त्यामुळे मी ही चिट्ठी फाडून टाकत आहे.’ त्यांनी माझ्यासमोरच ती चिट्ठी फाडली.” रहाणे पुढे म्हणाला की, खेळाडूवर बंदी आल्यास त्याचे करिअर कुठल्या वळणावर जाईल सांगता येत नाही, त्यामुळे कर्णधार म्हणून आपल्या सहकाऱ्याला वाचवणे ही माझी जबाबदारी होती.
या अंतिम सामन्यात यशस्वीने २६५ धावांची उत्कृष्ट द्विशतकीय खेळी केली होती आणि वेस्ट झोनने २९४ धावांनी विजय मिळवला होता. रहाणेच्या या निर्णयामुळेच यशस्वीवर बंदी टळली आणि पुढे २०२३ मध्ये त्याने भारतीय संघात यशस्वी पदार्पण केले. यशस्वीने वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान भारतासाठी कसोटी पदार्पण केले. तो सध्या संघाचा सलामीचा फलंदाज आहे.





