Ashes : दोन वर्षांनी पुरागमन करणार्या ख्वाजाने दोन्ही डावात शतके झळकावत केला विक्रम

सिडनी : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ऍशेज कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन करणार्या ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने या सामन्यातील दोन्ही डावात शतके झळकावत ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आपली आणखी योगदान देण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले. ख्वाजाने या सामन्यातील पहिल्या डावात 137 तर दुसर्या डावात नाबाद 101 धावा करत टीकाकारांचे तोंड बंद केले.
सिडनी क्रिकेट मैदानावर दोन्ही डावात शतके करणार तिसरा फलंदाज
सिडनी क्रिकेट मैदानावर कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करणार ख्वाजा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या केविन डग्लस वॉल्टर्स यांनी 1969 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 242 आणि 103 धावा केल्या होत्या,
तर माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 120 आणि 142 धावा केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर लेखातून उस्मान ख्वाजाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे.
कसोटी कारकीर्द
उस्मान ख्वाजाने 2010-11 च्या ऍशेस मालिकेतील पाचव्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. यासह, तो ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळणारा पहिला मुस्लिम आणि पहिला पाकिस्तानी वंशाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. 2013 मध्ये, शिस्तभंग केल्यामुळे त्याला इतर काही सहकार्यांसह निलंबित करण्यात आले होते. 2013 च्या ऍशेस मालिकेत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
2015 मध्ये, त्याने न्यूझीलंडविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले. त्यानंतर आतापर्यंत ख्वाजाने 9 कसोटी शतके झळकावली आहेत. त्याच वर्षी, मायदेशात डे-नाईट कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. 2019 मध्ये, त्याची इंग्लंडमधील ऍशेस मालिकेसाठी निवड झाली होती.
पहिल्या तीन सामन्यांत तो अर्धशतकही झळकावू शकला नाही आणि चौथ्या ऍशेस कसोटीसाठी त्याला वगळण्यात आले. त्यानंतर आता ऍशेज मालिकेतली चौथ्या सामन्यात संधी मिळाल्यानंतर दोन्ही डावात शतके करत ख्वाजाने आपले नाने खणखणीत असल्याचे सिद्ध केले.
एकदिवसीय कारकीर्द
ख्वाजाने 11 जानेवारी 2013 रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याच्या खराब कामगिरीमुळे ख्वाजाला संघातून वगळण्यात आले. मात्र ख्वाजाने 2019 मध्ये भारत दौर्यात दमदार पुनरागमन करत पुढील मालिकेत पाकिस्तानविरुद्धही चांगली कामगिरी केली. यामुळे त्याला 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले, परंतु गट फेरीतील एका सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला.
टी20 कारकीर्द
ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ख्वाजाने 31 जानेवारी 2016 रोजी भारताविरुद्ध पदार्पण केले. 2016 च्या ढ20 क्रिकेट विश्वचषकासाठी त्याची निवड झाली आणि बांगलादेशविरुद्ध त्याने पहिले आणि एकमेव टी20 अर्धशतक झळकावले. त्यानंतर, तो खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरला आणि सप्टेंबर 2016 पासून तो ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याही टी20 सामन्यामध्ये खेळला नाही.





