Ashadhi Wari 2025 : नांदेड सिटी वारी समितीची सामाजिक जाणिवेतून पायीवारी; हुंडाबळीविरोधात जनजागृती

पुणे – नांदेड सिटी वारी समिती आयोजित पुणे ते सासवड पायीवारी यंदा ११व्या वर्षात पदार्पण करत यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी नांदेड सिटी परिसरातून तब्बल ३०० माउलींनी या पायीवारीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत पुणे ते सासवड हे अंतर चालत पार करताना नांदेड सिटी वारी समितीचे सदस्य संजीव विजामवार, राहुल सोमवंशी, मनोज नंदे, अविनाश लगड, किरण भणगे, निलेश हगवणे, भालचंद्र कडू, सचिन रसाळ, राम बेद्रे यांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली.
या वारीचा विशेष उल्लेख म्हणजे अविनाश लगड युथ फाउंडेशनच्या संकल्पनेतून हुंडाबळीविरोधात सामाजिक जनजागृती करण्यात आली. “हुंडाबळी टाळा, समाज वाचवा” अशा आशयाचे फलक घेऊन वारकऱ्यांनी समाजप्रबोधनाचा संदेश दिला. पायीवारीत अध्यात्मासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीवही जपली गेली.
वारी दरम्यान आरती, अभंगवाणी आणि नामस्मरणाचे कार्यक्रम पार पडले. पुण्यातून रवाना झालेला पालखी सोहळा रविवारी रात्री सासवड मुक्कामी पोहोचला.





