Dhananjay Munde : राखेचा व्यवसाय लाभाचे पद ठरत नाही; धनजंय मुंडेंनी फेटाळला दमानियांचा दावा

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्याकडे कोणतेही लाभाचे पद नसल्याचे नमूद करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा दावा फेटाळून लावला आहे. परळी स्थित औष्णिक विद्युत प्रकल्पाची राख उचलण्याचा व्यवसाय लाभाचे पद ठरत नाही. त्यामुळे यासंबंधीच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही, असे ते म्हणाले. आमदार संदीप क्षीरसागर यांचा सरपंच हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दमानियांनी मुंडेंकडे आर्थिक लाभाचे पद असल्याचा दावा करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, महाजेनको ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या कंपनीने धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या कंपनीला एक कंत्राट देण्यात आले होते. या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपल्या कंपनीचा थेट फायदा करून घेतला.
राजीनाम्याच्या प्रश्नावर उत्तरास नकार
मुंडे म्हणाले की, मी राजीनाम्याच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी त्यांच्याकडे काही कागदपत्रेही दिली आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यंमत्री अजित पवार स्पष्ट उत्तर देतील. विशेषतः ते उत्तर त्यांनीच द्यावे अशी माझी सुद्धा इच्छा आहे.
क्षीरसागरांचा कृष्णा आंधळेशी संबंध?
पत्रकारांनी यावेळी बीडच्या सरपंच हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्यासोबत काहीतरी काळेबेरे घडण्यासंबंधी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या दाव्याविषयी मुंडे म्हणाले, संदीप क्षीरसागर यांना एवढे माहिती असेल किंवा आणखी कुणाला काही याविषयी माहिती असेल तर याचा अर्थ असा की, त्यांचे व त्या आरोपीचे कुठेतरी संबंध आहेत. ते संबंध असल्याशिवाय त्यांना ही माहिती मिळू शकत नाही. त्या संबंधांतून अशा पद्धतीने बातम्या पेरायच्या व आपल्याला ती बातमी मिळते.





