Asawari Jagdale – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात वडिलांना गमावलेल्या आसावरी संतोष जगदाळे यांना दिलेला शब्द पाळत बुधवारी पुणे महापालिकेमध्ये प्रशासकीय पदावर नियुक्ती देण्यात आली. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते आसावरी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी गटनेते गणेश बिडकर, नगरसेवक धीरज घाटे, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त (जनरल) पवनीत कौर आणि जगदाळे कुटुंबीय उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. आसावरी यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पुणे महापालिकेत समकक्ष पद निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले होते. महापालिका स्तरावर वर्ग-३ किंवा वर्ग-४ ची पदे भरण्याचे अधिकार असतात. मात्र, राज्य सरकारने आसावरी यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदाला मंजुरी देण्याचा आदेश दिल्याने त्यानुसार ही प्रक्रिया करण्यात आली. मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहिदांच्या कुटुंबाची काळजी घेणे, हेच संवेदनशील प्रशासनाचे कर्तव्य आहे, असेही महापौरांनी नमूद केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधून जगदाळे यांना शुभेच्छा दिल्या.