Raj Thackeray : MPSC विद्यार्थ्यांसाठी लवकरच चांगली बातमी? राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले…
Raj Thackeray : आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Raj Thackeray :पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रियेसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही आंदोलक विद्यार्थी ठाम आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला असून, अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले होते.
आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात MPSC आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या रास्त अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आता मुख्यमंत्र्यांशी या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
सस्नेह जय महाराष्ट्र,
५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं.स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.
म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा.
राज ठाकरे ।
— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2026
MPSC विद्यार्थ्यांसाठी लवकरच चांगली बातमी?
MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात लवकरच चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील काळात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांना संयम ठेवण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणती पावले उचलली जातात आणि भरती प्रक्रियेबाबत काय निर्णय घेतला जातो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तिघांनी उपोषण सोडलं
दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काल रात्री महत्वाची घडामोड घडली. आंदोलनात सहभागी असलेल्या तिघांनी रात्री आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते दूध पिऊन उपोषण सोडले असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली. प्रकृती खालावल्याने त्यांना उपोषण मागे घ्यावे लागल्याचे रोहित पवारांनी सांगितले. मात्र, उपोषण सुरुच राहणार असल्याचे देखील रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.





