Asaram Bapu – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू यांना महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी त्यांना येथे आणण्यात आले आहे. आसाराम बापू ८३ वर्षांचे आहेत. त्यांना सप्टेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती, त्यांना मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास संपूर्ण पोलीस संरक्षणात खोपोली येथील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या मल्टीडिसिप्लिनरी कार्डियाक केअर क्लिनिकमध्ये आणण्यात आले. पुढील सात दिवस त्याच्यावर येथे उपचार केले जाणार आहेत. १३ ऑगस्ट रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांना महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात पोलीस कोठडीत उपचार घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, जोधपूर पोलिसांचे पथक आणि दोन परिचरांसह त्यांना विमानाने मुंबईला नेण्यात आले. मुंबई विमानतळावर आल्यावर आसाराम यांना खोपोली येथील रुग्णालयात नेण्यात आले. सुरक्षेचा भाग म्हणून रायगड पोलिस कर्मचारी रुग्णालयात तैनात करण्यात आले आहेत. आसाराम यांना पॅरोल मंजूर करताना राजस्थान उच्च न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या, ज्यात त्याच्यासोबत चार पोलिसांची उपस्थिती असेल.तसेच त्यांच्यासोबत दोन अटेंडंट ठेवण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. आरोग्याच्या कारणास्तव शिक्षेला स्थगिती देण्याची आसाराम यांची याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळली होती. २०१३ मध्ये त्यांनी त्यांच्या आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम यांना इंदूरमध्ये अटक करण्यात आली होती आणि २०१८ मध्ये त्यांना पोस्को न्यायालयाने दोषी ठरवले आहे.