असदुद्दीन ओवेसी यांचे मोदी सरकारला ओपन चॅलेन्ज; म्हणाले,”सरकारमध्ये एवढा दम असेल तर…”

नवी दिल्ली : एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये एवढा दम आहे, तर मग चीनवर सर्जिकल स्ट्राइक का करत नाही? असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. तेलंगणातील आदिलाबाद येथे एका जाहीर सभेत ओवेसी बोलत होते.
भाजपचे राज्य प्रमुख बंदी संजय यांनी, ‘आपण तेलंगणातील जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राइक करू’ असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर ओवेसींनी पलटवार करताना हे आव्हान दिले. पुढे बोलताना ओवेसी म्हणाले, ‘ते म्हणतात की आम्ही ओल्ड सिटीमध्ये सर्जिकल स्ट्राइक करू. तर मग आम्ही काय बांगड्या घालून बसलो आहेत का? भाजपमध्ये एवढाच दम असेल, तर त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार चीनवर सर्जिकल स्ट्राइक का करत नाही.’ असे त्यांनी म्हटले.
यावेळी ओवेसी यांनी केसीआर आणि आपल्यातील गुप्त कराराच्या दाव्यांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, जर स्टेअरिंग माझ्या हाती असेल तर, आपल्याला (अमित शाह) त्रास का होतो? एवढेच नाही, तर भाजपने मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत आणि माझ्यावर आरोप करत आहेत की, स्टेअरिंग माझ्या हाती आहे. जर स्टेअरिंग माझ्या हातात असेल, तर तुम्हाला त्रास का होतात? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.
ओवेसी पुढे म्हणाले, तेलंगणातील काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की, राज्यात त्यांचे सरकार आले, तर 100 मतदारसंघांमध्ये राम मंदिर बांधतील आणि त्यांच्या उभारणीसाठी 10 कोटी रुपये देतील. तरीही भाजप नेते म्हणतात की, मुस्लिमांची खुशामत केली जात आहे, मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण केले जात आहे. खरे तर, मंदिरांना पैसा का दिला जात आहेत, यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. पण, पैसे द्यायचेच असतील तर सर्वांनाच द्या, कुणा एकट्याला देऊ नका, असेही ओवेसी म्हणाले.





