‘महाराष्ट्रातील तब्बल ‘इतक्या’ लाख महिलांना लखपती दिदी बनवणार’; PM मोदींसमोर अजित पवारांची मोठी घोषणा

Ajit Pawar | Lakhpati Didi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी महाराष्ट्रातील जळगाव येथे पोहोचले आहे, जिथे त्यांनी महिलांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. महिलांना प्रमाणपत्र देण्यापूर्वी पंतप्रधानांनी महिलांशी संवादही साधला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते.
यावेळी जनतेशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. ते म्हणाले, ‘आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं असे मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून स्वागत केल्याचे पहिल्यांदाच पाहत आहे, अशा शब्दात अजितदादा पवार यांनी पंतप्रधान यांचे स्वागत केले.
तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं मोदींचं उद्दिष्टं आहे. आपण महाराष्ट्रात 50 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प करूया. महिलांवर जबाबदारी टाकली तर महिला कोणतीही जबाबदारी यशस्वीरित्या पेलू शकतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्याच दिशेने आपण प्रवास करूया असेही पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, जळगावातील कानकोपऱ्यातून प्रत्येक तालुक्यातून महिला पंतप्रधानांना भेटायला आल्या. तुमचा उत्साह पाहून तुम्हाला सलाम केला पाहिजे. राज्याने महिलांना मान दिला आहे. सन्मान दिला आहे. सबल आणि सक्षम केलं आहे. महिला सक्षम होत आहेत. आपणही काही योजना आणल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचे स्वरुप काय आहे? याविषयीची माहिती जाणून घेऊ…
योजनेचा उद्देश काय?
केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत
ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे.
या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा?
लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.





