पीक नुकसानीच्या तब्बल 40 हजार तक्रारी दाखल

नगर – जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. अति प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारींचा पाऊस पाडला आहे. एकट्या नगर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 40 हजार 271 पीक नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीला मिळाल्या आहेत.
या तक्रारी मिळाल्यानंतर संबंधित कंपनीचे सर्वेअर, कृषी विभागाचे कर्मचारी आणि संबंधित शेतकरी यांच्या उपस्थितीत पंचनामे केले जात आहेत. केंद्र सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्या मोबदल्यात भरपाई मिळते. सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच पीक विमा घेतलेले शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपनीला देत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 40 हजार 271 पीक नुकसानीच्या तक्रारी कंपनीकडे दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 34 हजार 230 तक्रारींचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. 6 हजार 41 तक्रारींचे सर्वेक्षण बाकी आहे. तसेच यामध्ये 28 हजार 327 तक्रारी अशा आहेत ज्यांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.
मात्र, भरपाईच्या रकमेबाबत कार्यवाही अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळणे जास्त गरजेचे आहे. इतक्या तक्रारींचे कामकाज अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर वेळेचा अपव्यय न होता तत्काळ कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे कंपनी प्रतिनिधी व कृषी विभागाने या महत्वाच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.





