Kangana Ranaut : “समाज म्हणून आपण अपयशी, आत्मपरीक्षण करावे लागेल” – कंगना रनौत
कंगना रनौत यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संबंधित मुलीच्या माफीनाम्याच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करत आपली भूमिका मांडली.

Kangana Ranaut – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीचा माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
या व्हिडीओवर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, मुलांवर होणारे राजकीय प्रभाव आणि त्यांच्या संगोपनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
कंगना रनौत यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संबंधित मुलीच्या माफीनाम्याच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करत आपली भूमिका मांडली. त्या मुलीचे वय अवघे १५ वर्षे आहे आणि ती स्वतः सांगत आहे की तिने तिच्या आयुष्यात कधीही पंतप्रधान मोदींविरोधात कोणतीही पोस्ट केली नव्हती.
त्या दिवशी तिचे मित्र तिला तिथे घेऊन गेले आणि लोकांनी तिला पंतप्रधान मोदींविरोधात शिवीगाळ करण्यासाठी प्रवृत्त केले. आपल्या मुलांना वाईट विचारसरणीच्या फेमिनिस्ट (स्त्रीवादी) आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या प्रभावापासून वाचवा.
लक्ष द्या, एकाही स्कार्फ किंवा बुरखा घालणाऱ्या मुलीने असे असभ्य प्रदर्शन केले नाही, मग आपल्याच मुली इतक्या सहज भरकटल्या का जातात? कुठेतरी एक समाज म्हणून आपण अपयशी ठरत आहोत. आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल आणि आपल्या मुलींचे रक्षण करावे लागेल असे कंगना यांनी म्हटले आहे.






