PM Narendra Modi : मुलांना माफ करायचे म्हणत पंतप्रधान मोदींनी शेअर केला नवा व्हिडिओ; ‘त्या’ गोष्टीबाबत व्यक्त केली नाराजी
Narendra Modi : आंदोलनादरम्यान माझ्यासह दिवंगत आईलाही शिवीगाळ करण्यात आली - पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्यांनी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान आपल्यासह आपल्या दिवंगत आईलाही शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, या दिशाभूल झालेल्या मुलांना न्यायालयात खेचून किंवा शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे त्यांना माफ करायचे आहे, अशी भूमिका मोदींनी मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगानं पाहिलं आहे. काही मुलांनी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. कोणत्याही सभ्य समाजाला न शोभणार नाहीत, अशा शब्दांचा वापर करण्यात आला. मला तर शिव्या दिल्याच पण माझ्या स्वर्गीय आईला देखील शिवीगाळ करण्यात आली. किती घाणेरडे स्वरुप होते. पण, मला आज बोलायचंय, लहानपणात चुका होतात आणि लहानपणात या चुकांमधून सुधारण्याची संधी देखील असते,” असे मोदी म्हणाले.
” मला त्यांना माफ करायचे आहे. माणसांकडून चुका होतात. मात्र, आपल्या मुली अशा प्रकारची अपशब्दांची भाषा वापरत आहेत, हा संस्कृतीला धक्का आहे. अखेर ती मुले आपलीच आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. या मुलांना मिठीत घेऊन, योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे. ही दिशा भरकटलेली मुलं आहेत, त्यांना योग्य रस्ता दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं यामुळे परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचं आहे,” असे म्हणत मोदींनी आंदोलकांना माफ केल्याचे जाहीर केलं.
Abuses never solve anything.
Let’s guide the misguided.
Let’s work together.
Let’s work for Bharat. pic.twitter.com/yAePG60KYL
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2026
दातही आपले आणि जीभही आपलीच
“समाजानं पण माझं हे बोलणं स्वीकारावे कारण कधी कधी आपल्याच दाताखाली आपली जीभ येते, रक्त येतं पण आपण दात तोडत नाही. कारण दातही आपले आणि जीभही आपलीच आहे. मुलं देखील आपलीच आहेत. त्यांनी रस्ता दाखवणं आपलं काम आहे. भरकटलेल्यांना योग्य रस्ता दाखवणं कठीण काम आहे, पण हे कठीण काम करायचं आहे.”
“माझं मुलांना देखील आवाहन आहे, आपण देशासाठी एकत्र मिळून पुढे जाऊया, काहीतरी नवीन शिकूया, चुकांमधून शिकूया आणि स्वप्नांना घेऊन पुढे जाऊया. देश पुढे जात आहे, अजून पुढे जाणार आहे, आणि तुमचं देखील पुढं जाणं निश्चित व्हावं हे माझं स्वप्न आहे. आपण सगळ्यांनी मिळून देशाला पुढे घेऊन जाऊ या”, असे आवाहन करताना मोदींनी केले आहे. सध्या मोदींचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.
हेही वाचा:
Satara News : कोयना नदीपात्रात पाण्याचा वाढता लोंढा; धरणातून ३३ हजार क्युसेक विसर्ग





