Cincinnati Open 2024 : सबलेन्का-पेगुला, सिनर-टियाफो अंतिम फेरीत दाखल, मंगळवारी रंगणार लढती…

Cincinnati Open 2024 :- अव्वल मानांकित इटलीच्या जॅनिक सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला ७-६ (९), ५-७, ७-६ (४) असे पराभूत करताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला गटातून तिसऱ्या मानांकित बेलारूसच्या आरिना सबलेन्काने अव्वल मानांकित पोलंडच्या इगा स्विटेकचा पराभवाचा धक्का देताना सनसनाटी निर्माण करताना अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. महिला गटात आरिना सबलेन्का समोर अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचे तर पुरुष गटात जॅनिक सिनर समोर अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोचे आव्हान असणार आहे.
अंतिम लढत : पुरुष गट : जॅनिक सिनर (इटली) – फ्रान्सिस टियाफो (अमेरिका) (वेळ : 3.30 am, 20 आॅगस्ट)
अंतिम लढत : महिला गट : आरिना सबलेन्का (बेलारूस) – जेसिका पेगुला (अमेरिका) (वेळ :12.30 am, 20 आॅगस्ट)
पुरुष गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये जॅनिक सिनरने अलेक्झांडर झ्वेरेव्हला ७-६ (९), ५-७, ७-६ (४) असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. पहिला सेट जिंकण्यासाठी सिनरने एक तासाचा वेळ घेतला. दोन्ही खेळाडू एका एका पॉईंटसाठी झगडत होते. मात्र शेवटी सिनरने पहिला सेट जिंकताना लढतीमध्ये आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सेट अलेक्झांडरने जिंकताना पुन्हा एकदा लढत बरोबरीत आणली. मात्र तिसऱ्या आणि अंतिम सेटच्या टायब्रेकरमध्ये जॅनिक सिनरने आपला खेळ उंचावताना सेट आणि लढत जिंकताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
इटलीच्या जॅनिक सिनरने या हंगामात चार विजेतेपदे पटकावली असून तो पाचव्या विजेतेपदापासून केवळ एक लढत दूर आहे. नॉर्वेच्या कॅस्पर रुडने यापूर्वी सलग पाच वेळा विजेतेपद जिंकले आहेत. यापूर्वी सिनरला अलेक्झांडर झ्वेरेव्हने तब्बल चार वेळा पराभूत केले होते. टायब्रेकरमध्ये लढत कोणत्याही क्षणी एकमेकांकडे झुकू शकते. मात्र मी मानसिकदृष्ट्या सामन्यावरच लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे हा विजय मिळाला. अंतिम फेरीत दाखल झाल्याहच आनंद तर आहेच, अशी प्रतिक्रिया विजयानंतर अंतिम फेरीत स्थान निश्चित केलेल्या इटलीच्या जॅनिक सिनरने दिली.
महिला गटातून तिसऱ्या मानांकित बेलारूसच्या आरिना सबलेन्काने अव्वल मानांकित पोलंडच्या इगा स्विटेकला ६-३, ६-३ असा पराभवाचा धक्का देताना अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आरिना सबलेन्काने पाच वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या इगा स्विटेकची १५ लढतींची विजयी परंपरा खंडित केली. अरिनाला माद्रिद आणि रोम मध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत इगाकडून पराभव स्वीकारला लागला होता.
Winston-Salem Open 2024 : पहिल्या फेरीतच सुमित नागलचे आव्हान संपुष्टात…
विजयाचा नक्कीच आनंद आहे. इगा बरोबर खेळताना, ही लढाई नक्कीच अवघड असल्याचे सबलेन्का म्हणाली. सरळसेट मध्ये विजय मिळाला ही माझ्यासाठी मोठी कामगिरी असल्याचे सबलेन्काने सांगितले. मी माझ्या अपेक्षापेक्षा चांगला खेळ केला, असे माझे प्रामाणिक मत आहे. तरी देखील मी या निकालावर आनंदी असल्याचे सांगताना इगा स्विटेकने आगामी काळात आजून चांगले खेळण्यासाठी सरावावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.




