अरविंद केजरीवाल यांच भाजपला ओपन चॅलेंज; म्हणाले…

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला खुलं आव्हान दिलं आहे. भाजपला आव्हान देताना केजरीवाल म्हणाले, ‘हिंमत असेल तर एमसीडी निवडणुका वेळेवर करा आणि जिंकून दाखवा, आम्ही राजकारण सोडू.
केंद्रशासित राज्यापर्यंत मर्यादित असलेल्या आम आदमी पक्षाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पूर्ण राज्य असलेल्या पंजाबमध्ये सत्ता काबिज केली. या विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या केजरीवाल यांनी म्हटलं की, भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो, आणि त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटली. तुम्ही दिल्लीतील छोट्याशा निवडणुकीला घाबरलात, तुमच्या हिंमत नाही, तुमचा धिक्कार आहे, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.
भाजपला आव्हान देताना केजरीवाल म्हणाले की, दिल्ली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणे म्हणजे लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आहे. भाजप आज पराभवाच्या भीतीने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. उद्या ते राज्यांच्या आणि देशाच्या निवडणुका पुढे ढकलतील.
दिल्लीतील तीन महापालिका एकत्र करत असल्याचं सांगून निवडणुका लांबवण्यात आल्या. उद्या भाजप गुजरात गमावणार या भीतीने गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करत आहेत, अस म्हणत निवडणूक टाळतील का ? अशाचप्रकारे लोकसभा निवडणूक पुढे ढकणार का? असे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले.





