नवी दिल्ली : पोटनिवडणुकीत गुजरातच्या विसावदर आणि पंजाबच्या लुधियाना पश्चिम मतदारसंघात मिळालेल्या विजयाने आम आदमी पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे या पक्षाने आता मिशन २०२७ सुरू केले आहे. २०२७ मध्ये पंजाब आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरात मधील हा विजय २०२७ च्या निवडणुकीचे संकेत आहेत असे विधान पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले असल्यामुळे ते आता गुजरातवर लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचे मानले जाते. विसावदरमधून विजयी झालेले गोपाल इटालिया आणि लुधियाना पश्चिममधून विजयी झालेले संजीव अरोरा यांच्यासोबत दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केजरीवाल म्हणाले, गुजरातमधील लोक त्रस्त आहेत. गुजरात सरकारचे एक मंत्री मला भेटले. त्यांनी मला सांगितले की येथील लोक भाजपच्या ३० वर्षांच्या राजवटीने त्रस्त आहेत. त्यांना त्यांचा पराभव करायचा आहे, परंतु भाजपची प्रशासनावर इतकी पकड आहे की ते शक्य होईल की नाही हे माहित नाही. मी म्हटले होते की ही लोकशाही आहे, ज्या दिवशी जनता उठेल, मोठे सिंहासन हादरतील. गुजरातचा हा विजय २०२७ च्या निवडणुकीचे लक्षण आहे. हे दर्शवते की गुजरातच्या लोकांकडे आजपर्यंत पर्याय नव्हता. आता आप पर्याय म्हणून आली आहे. कॉंग्रेसवर टीका करताना केजरीवाल म्हणाले की काँग्रेस हा पर्याय नाही, काँग्रेस भाजपच्या मांडीवर बसली आहे, ती त्यांच्या खिशात आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला १७ जागा मिळाल्या. त्यांच्या १७ पैकी ५ आमदार भाजपला गेले. आम्हाला ५ जागा मिळाल्या, पाच पैकी एक आमदार भाजपला गेला. आमची काँग्रेसशी चर्चा झाली होती. त्यांच्याकडे पाच जागा होत्या, आमच्याकडे एक जागा होती. काँग्रेसने म्हटले की तुम्ही आमच्या पाच जागांवर निवडणूक लढवू नका, आम्ही एका जागेवर निवडणूक लढवणार नाही. आम्ही म्हणालो ठीक आहे. आपने त्या पाच जागा लढवल्या नव्हत्या. यावेळी आपच्या जागेवर निवडणुका झाल्या, मात्र भाजपकडून आदेश आला, काँग्रेस तो आदेश नाकारू शकली नाही. काँग्रेसने आपशी विश्वासघात केला आणि उमेदवार उभा केला. त्यांना आम्हाला पराभूत करण्यासाठी उभे केले होते, पण आम्ही जिंकलो. त्यांनी पाचही जागा गमावल्या. अरविंद केजरीवाल म्हणाले की, यावरून देशाला काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा नाही हे स्पष्ट होते. काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व भाजपशी संगनमताने जुळले आहे. याचा पुरावा आहे. प्रत्येक रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला फसवल्यासारखे वाटते आहे. आप व्यवस्थेशी लढत आहे. काँग्रेसचे ७० मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत.