#INDvSL 3rd T20I : टीम इंडियाचा श्रीलंकेवर मोठा विजय, मालिकाही 2-1ने जिंकली

राजकोट – भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांपैकी तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 91 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली. मुंबईतील पहिला टी-20 सामना भारताने जिंकला. त्याचवेळी पुण्यातील दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत पुनरागमन केले. श्रीलंकेच्या संघाला मागील सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांवर गारद झाला.
No surprises there as @surya_14kumar is adjudged Player of the Match for his scintillating unbeaten century in the 3rd T20I. 👏🏾🫡⭐️
Details – https://t.co/AU7EaMxCnx #INDvSL #TeamIndia @mastercardindia pic.twitter.com/bbWkyPRH4m
— BCCI (@BCCI) January 7, 2023
भारताकडून सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. शुभमन गिलने 46 आणि राहुल त्रिपाठीने 35 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने दोन बळी घेतले.
श्रीलंकेच्या संघाकडून कुशल मेंडिस आणि कर्णधार दासून शनाका यांनी फलंदाजी करताना 23-23 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. हार्दिक पांड्या, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेलने एक विकेट आपल्या नावावर केली.
आता दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना 10 जानेवारीला गुवाहाटी येथे होणार आहे. दुसरा सामना 12 जानेवारीला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. यानंतर मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे.





