Arshdeep Singh Fined : टी-२० विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Arshdeep Singh Fined : टीम इंडियाचा खेळाडूला आयसीसीच्या (ICC) रोषाला सामोरे जावे लागले आहे, ज्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Arshdeep Singh fined for breaching ICC code of conduct : भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. घरच्या मैदानावर जेतेपद मिळवून भारताने विश्वविक्रम रचला असला, तरी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आयसीसीच्या (ICC) रोषाला सामोरे जावे लागले आहे. मैदानातील एका गैरवर्तणुकीमुळे अर्शदीपच्या मॅच फीमधील १५ टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ११ व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. अर्शदीपने आपल्या गोलंदाजीवर चेंडू अडवल्यानंतर तो फलंदाज डॅरिल मिचेलच्या दिशेने धोकादायक पद्धतीने फेकला. हा चेंडू मिचेलच्या ‘थाय पॅड’वर जाऊन आदळला, ज्यामुळे मिचेल कमालीचा संतापलेला दिसला. अर्शदीपची ही कृती आचारसंहितेच्या कलम २.९ चे उल्लंघन असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडूवर किंवा त्याच्या जवळ अयोग्य पद्धतीने चेंडू फेकण्याशी संबंधित आहे.
View this post on Instagram
डिमेरिट गुण आणि दंड –
India pacer fined for breaching the ICC Code of Conduct during the #T20WorldCup Final.https://t.co/NbnGMkIbzE
— ICC (@ICC) March 10, 2026
या चुकीसाठी अर्शदीपला केवळ आर्थिक दंडच नाही, तर १ डिमेरिट गुण देखील देण्यात आला आहे. अर्शदीपने आपली चूक मान्य केल्यामुळे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पुढील सुनावणीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. २४ महिन्यांच्या कालावधीत जर एखाद्या खेळाडूचे ४ डिमेरिट गुण झाले, तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जाते. अर्शदीपची गेल्या दोन वर्षांतील ही पहिलीच चूक आहे.
विजयाचा जल्लोष आणि दिलगिरी –
सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंगने आपल्या वागण्याबद्दल डॅरिल मिचेलची माफी मागितली आणि दोघांनी हस्तांदोलनही केले. भारतीय संघाने या सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत जेतेपद उंचावले, मात्र अर्शदीपसाठी ही कारवाई एक छोटासा डाग ठरली आहे.
९६ धावांनी मिळवला होता मोठा विजय –
अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी २५० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव १५९ धावांत गुंडाळून ९६ धावांनी विजय साकारला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने केवळ एक सामना गमावला आणि आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली. या विजयाने टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.





