Arrival of the rains: शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, तापमान घसरले
Arrival of the rains:

Arrival of the rains: शहरात सलग तिसऱ्या दिवशी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. यामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली असून ३५ अंशांवर गेलेले तापमान ३१ अंशांपर्यंत खाली आले आहे. पुढील ४८ तासांत संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
मंगळवारी (दि. ३०) पहाटेपासूनच उपनगरांसह मध्यवर्ती भागात पावसाच्या हलक्या सरींना सुरवात झाली. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारनंतर पुन्हा ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसामुळे रात्री हवेत चांगला गारवा निर्माण झाला होता.
सायंकाळपर्यंत शिवाजीनगर परिसरात ४ मिमी, तर एनडीए आणि चिंचवड परिसरात १ ते २ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील शिवाजीनगर, कोथरुड, डेक्कन, स्वारगेट, सिंहगड रोड, हडपसर या मुख्य भागांसह पाषाण, औंध, कल्याणीनगर, वानवडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात चांगला पाऊस झाला.
जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कायम आहे. लोणावळा, डोंगरवाडी आणि ताम्हिणी घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला असून धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.
सध्याच्या पावसामुळे खरिपाच्या रखडलेल्या कामांना गती मिळणार असून, हवामान विभागाने नागरिकांना घाट परिसरात प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.





