पुणे | नवरात्रोत्सवासाठी रताळींची आवक ; कर्नाटकातून माल दाखल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नवरात्रोत्सवानिमित्त बाजारात रताळींची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रताळींची आवक स्थिर आहे. दरात मात्र थोडीशी वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, मलकापूर येथून आवक होत आहे, तर कर्नाटक, बेळगाव येथून आवक झाली आहे.
आदिमायेच्या महोत्सवानिमित्त गुरुवार (दि. ३) पासून उपवास सुरू होत आहेत. त्यामुळे मागील १५ दिवसांपासूनच रताळींची आवक सुरू झाली आहे. येथील बाजारात दररोज २५ ते ३० पिकअप आवक होत आहे.
एका पिकअपमध्ये साधारणपणे ६० पोती असतात. एका पोत्यात सुमारे ४० किलो रताळी असतात. गेल्या वर्षी घाऊक बाजारात एक किलोला २० ते ३० रुपये दर मिळाला, तर यंदा ३० ते ३५ रुपये दर झाला आहे.
आवक मात्र स्थिर असल्याचे व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले. दरम्यान, मागील वर्षी बेळगाव रताळींची आवक झाली नव्हती. मंगळवारी तिथून (दि. १) २ पिकअप आवक झाली. त्यांना घाऊक बाजारात प्रतिकिलो २० ते २२ रुपये दर मिळाला.
कराड, मलकापूर भागांतील गावरान रताळी आकाराने लहान असतात. चवीला गोड असतात, तर बेळगाव परिसरातील रताळी तुरट आणि आकाराने मोठी असतात. त्यामुळे कर्नाटकपेक्षा राज्यातील रताळींना जास्त मागणी असते. – अमोल घुले, रताळी व्यापारी, मार्केट यार्ड





