पुणे | विनाकारण चेन ओढल्यास अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तरच साखळी ओढावी, असे आवाहन रेल्वे विभागाकडून वारंवार केले जाते. मात्र, रेल्वे प्रवासात अनेक वेळा किरकोळ कारणासाठीही चेन ओढली जात असून, काही प्रवाशी तर गंमत म्हणून चेन ओढत असल्याचे समोर आले. त्यामुळे या विनाकारण चेन ओढणाऱ्यांवर आरपीएफकडून करडी नजर ठेवून कारवाई केली जात आहे. त्यानुसार मागील वर्षभरात पुणे रेल्वे विभागाअंतर्गत दीड हजार जणांना अटक करून आठ लाखांचा दंड वसूल केला आहे.
रेल्वेतून प्रवास करताना कधी जीवघेणा प्रसंग उद्भवला किंवा अपघात झाला, कुठे आग लागली, अशा वेळी प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ नये, यासाठी रेल्वे डब्यात असलेली साखळी ओढून गाडी थांबवता येऊ शकते.
मागील काही महिन्यांमध्ये प्रवासी अगदीच किरकोळ कारणांसाठी साखळी ओढत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे अन्य प्रवाशांना विनाकारण त्रास होतो आणि गाड्यांना उशीरही होतो. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित होण्याचे प्रकार घडले आहेत. अशा नाहक साखळी ओढणाऱ्या प्रवाशांवर रेल्वेच्या कायद्यानुसार कलम १४१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे विभागात ६३ लाख दंड वसूल…
एप्रिल २०२३ ते २८ जून २०२४ या काळात मध्य रेल्वेने विभागात नाहक अलार्म चेन ओढण्याची ११ हजार ४३४ प्रकरणे नोंदवली. रेल्वे कायद्याच्या १४१ नुसार ९६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६३ लाख २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
त्यामुळे गरज असेल तेव्हा अलार्म चेन ओढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे विभागात १ हजार ९९२ जणांवर कारवाई करून त्यातील जवळपास दीड हजार जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.




