“लालकृष्ण आडवाणी यांना अयोध्येचा कार्यक्रमाला आणण्याची व्यवस्था केली पाहिजे”

अयोध्या – राम मंदिराच्या उभारणीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण आडवाणी यांचे प्रचंड योगदान आहे. त्यांना याची देही याची डोळा हा रामलल्ला विराजमान होण्याचा सोहोळा पहाता आला पाहिजे. त्यामुळे मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमात लालकृष्ण आडवाणी यांना येथे आणण्याची व्यवस्था केली पाहिजे अशी आग्रही सूचना भाजपचे माजी खासदार आणि राममंदीर चळवळीतील एक संत रामविलास वेदांती यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना केली आहे.
मंदिर विश्वस्त समितीने आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव अयोध्येतील कार्यक्रमाला येऊ नये अशी सूचना केली होती. त्या पाश्र्वभूमीवर वेदांती यांनी ही सूचना केली आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की आडवाणी यांचे राम मंदिर चळवळीतील योगदान लक्षात घेता त्यांना मंदिर उद्घाटन कार्यक्रमात मंदिराच्या गर्भ गृहात बसवण्याची व्यवस्था केली पाहिजे.
आडवाणी यांनीच सोमनाथ ते अयोध्या अशी यात्रा काढून राम मंदिर मोहीमेला मोठे जनसमर्थन मिळवले होते हे विसरता येणार नाही असे ते म्हणाले. मंदिर विश्वस्त समितीचे सरचिटणीस चंपत राय यांनी आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या व वयोमानाच्या कारणावरून या कार्यक्रमासाठी येऊ नका अशी विनंती केली होती व ही विनंती त्यांनी मान्य केल्याचे चंपत राय यांनीच जाहीर केले होते. तेव्हापासून या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.





