Nevasa News : नेवासा शहरालगत तीन वस्त्यांवर सशस्त्र दरोडा; एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास
Nevasa News : नेवासा शहरालगतच्या उस्थळ रोड परिसरातील कदम, शिंदे आणि भालसिंग वस्त्यांवर शनिवारी मध्यरात्री ६ जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Nevasa News : नेवासा शहरालगतच्या उस्थळ रोड परिसरातील कदम, शिंदे आणि भालसिंग वस्त्यांवर शनिवारी (दि. ३) मध्यरात्रीच्या सुमारास सहा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकल्याची घटना घडली. काठ्या, कोयते आणि लोखंडी गज घेऊन आलेल्या टोळीने एका पुरुषाला मारहाण करून त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. (Nevasa News)
कदम वस्तीतील विजय गोरक्षनाथ कदम (वय ४५) यांनी याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कदम हे रात्री घराच्या पोर्चमध्ये झोपले असताना साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहा अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यातील एकाने धमकावत त्यांच्या गुडघ्यावर दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर चौघांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, तर दोघे बाहेर पहारा देत होते. (Nevasa News)
घरातील कपाटाची उचकापाचक केल्यानंतर चोरट्यांनी कदम यांना घरात नेऊन त्यांचे हात-पाय बांधून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांचा पुतण्या गणेश राजेंद्र कदम याने कडी उघडून त्यांची सुटका केली. (Nevasa News)
कदम यांच्या घरातून १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, सोन्याची बाळी, नथ, अंगठी, कुडके, चांदीचे दागिने आणि २३ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. याच रात्री काकासाहेब बाप्पू शिंदे आणि गोरख तुकाराम भालसिंग यांच्या घरातही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. (Nevasa News)
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नेवासा शहरातील विवेकानंद कॉलनीत व्यापारी रामभाऊ जगताप यांच्या घरातून पाच लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर शहरालगतच्या तीन वस्त्यांवर दरोडा पडल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांकडून सुरू आहे. (Nevasa News)
आमदार लंघे यांची घटनास्थळी भेट
दरोड्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी कदम वस्तीला भेट देऊन पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला. दरोड्याचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले आणि नगरसेवक उपस्थित होते. (Nevasa News)





