Cricket Board Robbery : क्रिकेट विश्वात खळबळ! भर दिवसा क्रिकेट बोर्डावरच सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर लुटले १५,००० डॉलर्स
Cricket Board Robbery : आजपर्यंत तुम्ही विविध ठिकाणी दरोडा पडल्याचे ऐकले असेल पण आता चक्क क्रिकेट बोर्डावर दरोडा पडल्यांची घटना समोर आली आहे

Trinidad and Tobago Cricket Board Robbery : वेस्ट इंडिज क्रिकेट विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो क्रिकेट बोर्डाच्या (TTCB) मुख्य कार्यालयात दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडला असून, लुटारूंनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे स्थानिक क्रिकेट प्रशासनासह खेळाडूंमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
भरदिवसा बंदुकीच्या धाकावर लूट –
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिनिदाद आणि टोबॅगो क्रिकेट बोर्डाचे हे कार्यालय कौवा येथील ‘क्लिफोर्ड रोच ड्राईव्ह’वर स्थित आहे. गुरुवारी दुपारी १:३० च्या सुमारास काही अज्ञात सशस्त्र लुटारूंनी कार्यालयात प्रवेश केला. लुटारूंनी थेट कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना ओलीस ठेवले आणि कपाटातील सुमारे १५,००० त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर्स (TT$) रोख लुटून नेले. ही संपूर्ण घटना इतकी अचानक घडली की कर्मचाऱ्यांना प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह –
View this post on Instagram
लुटमारीनंतर दरोडेखोर एका वाहनात बसून वेगाने फरार झाले. या घटनेने देशातील महत्त्वाच्या क्रीडा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. क्रिकेट बोर्डाने या हिंसक घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “बंदूकधाऱ्यांनी पसरवलेली दहशत आणि कर्मचाऱ्यांना दिलेला मानसिक धक्का सहन करण्यापलीकडे आहे.”
तपास सुरू, कोणालाही अटक नाही –
स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास पथके दरोडेखोरांच्या शोधात ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. सध्या तरी या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक आधीच चिंतेत असताना, आता थेट क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.





