पुणे जिल्हा | कोरेगाव भीमामध्ये पोलिसांचे सशस्त्र संचलन

कोरेगाव भीमा, (वार्ताहर)- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बाजार मैदानात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन व दंगा काबू पथकाची तालीम व सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले.
कोरेगाव भीमा येथील बाजार मैदानात शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले.
यावेळी गणेश विसर्जन मार्गावरील ग्रामपंचायत बाजार मैदान, विघ्नहर्ता चौक, होळकर वाडा,लिंब चौक, भैरवनाथ मंदिर चौक, आदर्श चौक , दोस्ती चौक ते पोलीस चौकी असे पथ संचलन करण्यात आले.
यावेळी जमाव नियंत्रणात आणणे, प्रसंगी लाठी चार्ज व अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर तसेच जखमी झालेल्या नागरिकांना सुरक्षित नेण्याचा सराव करण्यात आला.
दंगा काबूत करण्याची तालीम व सशस्त्र पोलीस संचलन पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, रोहिणी सोनावले, पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे, पोलीस हवालदार संदीप कारंडे व ४२ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सरपंच संदीप ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, माजी संचालक कैलास सोनवणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, विक्रम गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील, भाजपचे संपत गव्हाणे, मधुकर कंद, नितीन पोपट गव्हाणे उपस्थित होते.





