Arjun Kapoor Warns Fans About Online Scam : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या नावाचा वापर करून ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत अर्जुन कपूरने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. तसेच, आपल्या चाहत्यांना या फसवणुकीबाबत सावधही केले. सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध व्यक्ती, उच्चपदस्थ अधिकारी यांच्या नावाचा वापर करून सर्वसामान्यांची ऑनलाइन माध्यमातून फसवणूक केली जात आहे. त्यातच आता अर्जुन कपूरचा मॅनेजर असल्याचे सांगून काही सोशल मीडिया अकाउंट्सवरून फसवणूक केली जात आहे. अर्जुन कपूरने चाहत्यांना सावध करत सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. अभिनेत्याने लिहिले की, ‘माझ्या लक्षात आले आहे की काही अकाउंट्स लोकांशी माझे मॅनेजर असल्याचे सांगत संपर्क करत आहे. तसेच, माझ्याशी भेट घडवून दिली जाईल, असा दावा करत आहेत. लक्षात घ्या की, हे मेसेज खरे नाहीत व माझा याच्याशी काहीही संबंध नाही.’ ‘मी कोणालाही कधीही लिंकवर क्लिक करण्यास अथवा खासगी माहिती शेअर करण्यास सांगणार नाही. कृपया, अशा स्कॅमला बळी पडू नका व सावध राहा. तुम्ही जर अशाप्रकारचे मेसेज पाहिले तर अकाउंटला रिपोर्ट करा’, असे म्हणत अर्जुनने आपल्या चाहत्यांना या स्कॅमपासून सावध केले आहे.