Pune District : इच्छुकांची निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण ?

रांजणी : बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची संदिग्धता आता संपली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका निवडणुकीची धामधूम लवकरच सुरू होईल. ग्रामीण भागात तर, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केल्याचे चित्र दिसू लागले आहे.
५ किंवा ६ नोव्हेंबरला राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समिती, तसेच २४७ नगर परिषदा आणि १४७ नगर पंचायतीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल. ३ किंवा ४ डिसेंबर रोजी नगर परिषदा-नगर पंचायतींसाठी मतदान, तर जिल्हा परिषय-पंचायत समितीसाठी ८ किवा ९ डिसेंबर रोजी मतदान होईल. तर या दोन्हींची मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक लढवण्यासाठी इच्छुकांची तयारी देखील पूर्ण झाल्याचे चित्र पहावयास मिळते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जवळपास सर्व तयारी झाली आहे. महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय योजना आखली आहे,९ डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती साठी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून आढावा घेतला आहे. राज्य सरकारने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याची तयारी केली
पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका…
पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील,तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल. ११ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील सर्व निवडणुकीचा कार्यक्रम संपलेला असेल, असे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे.





