पिंपरी | मुलांचा पालकांशी संवाद हरवतोय का?

पिंपरी, (प्रतिनिधी) – पालक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद कमी होत चालला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संवादाच्या अभावामुळे मुले एकलकोंडी झाली आहेत. थोड तरी मनाविरूद्ध घडल तरी ते आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
शहरात घडलेल्या तीन घटनांमुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आता माणसच माणसासाठी दुर्मीळ होत चालली आहेत. अगदी छोटे बाळ जरी रडले, तरी आई मोबाइलवरच, पाहुणे घरात आल्यानंतर आई मोबाइलवरच, ड्रायव्हिंग करताना सुद्धा आई मोबाइलवर! किती मोठा बदल पूर्वीपेक्षा आताच्या पिढीमध्ये झालेला आहे.
मुलंसुद्धा पाचवीनंतर स्वतःचा मोबाइल वापरू लागली आहेत. लहान मुले रडली तरी त्यांना मोबाइलवर गेम्स, व्हिडिओ लावून मुलांच्या हातात देतात. पालकांनी मुलांच्या हातात मोबाइल दिल्याने, मुलांमध्ये संवाद हरवत चालला आहे.
हल्ली पाहिले तर मोबाइलच्या सवयीमुळे मुले मैदानी खेळ विसरली आहेत. लोक हृदयापेक्षा डोक्याने जास्त विचार करू लागलेत. त्यामुळे भावनेचा ओलावा संपलाय. साधला पाहिजे तोच संवाद हरवला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही ठिकाणी मुलांना दहावीनंतरही अभ्यासाकरिता मोबाइल मिळत नाही. आई-वडिलांचा फोन असतो. कॉलेजला जाताना देतात. पालकांनी मोबाइलसाठी नकार दिला तर मुल चक्क आत्महत्या करू लागलीत. एखादी गोष्ट एखाद्या माणसाची नाही आवडली, तर पूर्वी दिवसेंदिवस माणसं गप्प राहून मौन पाळून उत्तर देत होती.
आता मात्र एकमेकांचे म्हणणे पटले नाही म्हणूनसुद्धा माणसं माणसांना ब्लॉक करतात आणि कायमचं माणसाशी असलेलं नातं संपवून टाकतात. रागारागात समोरच्याला आपले मत नसेल पटत, तर जाऊन भेटा, बोला, मुद्दा पटवा. मात्र तसे कोठेही होताना आढळून येत नाही.
घटना क्रमांक एक
गावी गेलेल्या आईशी मुलाने फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर मुलाने रागाने मोबाइल फेकून देत इमारतीवरून उडी मारत आपली जिवनयात्रा संपविली.
घटना क्रमांक दोन
आईच्या विरोधानंतरही लॅपटॉपवर मुलगा तास्नतास गेम खेळत होता. त्याला देण्यात आलेल्या टास्कनुसार त्याने इमारतीवरून उडी मारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
घटना क्रमांक तीन
होमवर्क केला नाही म्हणून शाळेतील शिक्षिकेने शाळेत पालकांना घेऊन येण्यास सांगितले. या कारणावरून त्या विद्यार्थ्याने नदीत उडी मारत आत्महत्या केली.
घटना क्रमांक चार
देहूरोड येथे काही महिन्यांपूर्वी दहावीचे वर्ष असल्याने पालकांनी मुलीच्या हातातील मोबाइल काढून घेतला. यामुळे संतापलेल्या मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
पालकांनी आपल्या मुलांशी कसे वागावे?
– पाल्यावर अधिकार गाजवू नये
– पाल्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे
– प्रत्येक कृती करण्यास प्रेमाने सांगावे
– सांगताना आपली कृती तपासावी
– मुलांवर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये
– मुलांना जास्तीत जास्त वेळ द्यावा
– मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्याव्यात
– पालकांनी आपल्या मुलाची तुलना इतरांशी करू नये





