पुणे जिल्हा | डंपरच्या धडकेने कळंब येथे कमान उध्वस्त

मंचर, (प्रतिनिधी) – कळंब, ता. आंबेगाव येथील महाळुंगे पडवळ फाट्याजवळील हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या नावाने असणारी कमान (वेस) डंपर हायवा चालकाच्या हलगर्जीपणामुळे उध्वस्त झाली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, वेशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विलास साबळे आणि सतीश तांबे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. अपघाताच्या ठिकाणी घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. डंपर हायवाद्वारे अनावधानाने चालू गाडीत अचानकपणे हायड्रोलिक उघडल्याने वेशीला अडकून कमान जमीनदोस्त झाली आहे.
१० वर्षांपूर्वी ठेकेदाराने वेशीचे काम करताना फाउंडेशन खोल घेतले नसून तळाला स्टील कमी गेजचे वापरले असून वेशीचे काम दर्जेदार केलेले नसल्याची चर्चा ग्रामस्थामध्ये होते. डंपर हायवाचालकाच्या हलगर्जीपणामुळे चालू गाडीत अचानकपणे हायड्रोलिक उघडल्याने वेशीला अडकून कमान जमीनदोस्त झाली आहे.
घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, दत्ता कानडे, तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव, माजी उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, अमित भालेराव यांच्यासह नागरिकांनी पोलीस प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत अडकलेली डंपर हायवा गाडी व पडलेली वेस (कमान) रस्त्यातून बाजूला करण्याकामी मदत केली. घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व कळंब ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. झालेल्या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी महाळुंगे पडवळ ग्रामस्थांनी केली आहे.





