कैरो : गाझा पट्ट्यातल्या पॅलेस्टिनींना इजिप्त आणि जॉर्डनने सामावून घ्यावे, हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेला प्रस्ताव अरब देशांनी फेटाळून लावला आहे. इजिप्त, जॉर्डन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि अरब लीग यांनी या संदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. गाझा आणि वेस्ट बँकेतील पॅलेस्टिनींना त्यांच्या भूमीतून बाहेर काढून अन्य देशात स्थलांतरित करण्याला या देशांनी विरोध केला आहे. गाझा पट्ट्यातील पॅलेस्टिनींना जॉर्डन आणि इजिप्तमध्ये सामावून घेतले जावे. यासाठी आपण या देशांच्या नेत्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात सुचवले होते. गाझातील २.३ दशलक्ष पॅलेस्टिनी सध्या दक्षिण गाझामध्ये विस्थापित झाले आहेत. गाझाच्या फेरउभारणीला वेळ लागू शकतो. या कालावधीमध्ये या पॅलेस्टिनींना हंगामी स्वरुपात जॉर्डन आणि इजिप्तमध्ये हलवले जावे, असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र अशा योजनांमुळे प्रदेशाची स्थिरता धोक्यात येऊ शकते. तसेच संघर्ष वाढण्याचा धोका देखील निर्माण होतो आणि तेथील लोकांमध्ये शांतता आणि सहअस्तित्वाच्या शक्यता कमी होतात, असा इशारा अरब देशांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनात देण्यात आला आहे. अरब देशांच्या प्रतिनिधींबरोबर पॅलेस्टिनींच्या वरिष्ठ नेत्यांची कैरोमध्ये बैठक झाली. गाझामध्ये सर्वसमावेशक आणि स्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाच्या मदतीची आपल्याला अपेक्षा आहे, असेही या देशांनी म्हटले आहे.