एप्रिल फूल करणे पडणार महागात; खावी लागणार जेलची हवा

मुंबई : राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना एप्रिल फूलच्या नावाखाली चेष्टा केली तसेच अफवा पसरवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. कोरोना विषाणूचे वाढते संकट आणि लॉकडाऊन यामध्ये कोणीही कोरोनासंबंधित कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणारे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मॅसेज टाकू नये, असे आवाहन गृहमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.
‘१ एप्रिल दिवशी सर्व जण दरवर्षी आपल्या सहकारी, मित्रांची एप्रिलफूलच्या नावाखाली चेष्टा करतात. मात्र आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र कोरोनाविरोधात लढत आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणी एप्रिलफूलच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अफवा किंवा चेष्टा करु नये. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. याबाबतील कोणी सहकार्य करणार नाही किंवा अफवा पसरवेल. तर त्याच्यावर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे सांगत आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा, प्रवास करु नका असे वारंवार आवाहन गृहमंत्र्यांकडून करण्यात येत आहे. मात्र तरी सुद्धा अनेक जण सरकारने सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे विनंती करुनही सहकार्य करत नाही अशांवर लाठीचा वापर करा, असे गृहमंत्र्यांनी पोलिसांना सांगितले आहे.





