आज अर्ज उद्या कर्ज; महाराष्ट्राचे डोके चक्रावेल असा घोटाळा; सुरेश धसांच्या आरोपाने पुन्हा खळबळ

मुंबई : राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आराम घेत आहेत. असं असताना आता धनंजय मुंडे यांना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. त्यांना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना 2 मिनिटेही नीट बोलता येत नाही, असं ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दुसरीकडे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत: राजीनामा दिला होता, सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही स्वत: पाहिलंय की अजित पवारांनी राजीनामा दिला होता. मग, धनंजय मुंडे का देत नाहीत, असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
सुरेश धस म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटींचा घोटाळा झाला आहे. शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जीआर निघाला. हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सूचवले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा असे आदेश काढले अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.
पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांनी आज अर्ज उद्या कर्ज अशा स्वरुपात सर्व करुन ठेवले, टेंडर काढताना अतिशय डोक्याने ते काढले आहे. कुणाला काही कळू नये असे टेंडर काढण्यात आले, महाराष्ट्राचे डोके चक्रावेल असं सर्व आहे. नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे, DAP मध्ये 56 कोटी 76 लाख रुपये, बॅटरी 45 कोटी 53 लाख, कापूस साठवणूक बॅगमध्ये 577 ची बॅग 1250 रुपये घेण्यात आली. तर, 180 कोटी 83 लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या चमूने बाहेर काढल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
भारतीय किसान संघाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते, संबंधित घोटाळ्याची तपासून कारवाई करावी. मात्र, वाल्मिक कराड यांनी हे पत्र फाडून टाकले होते. कृषी विभागाला चॅलेंज करतो हे पत्र तुमच्याकडे आहे का? असंही धस यांनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याचे उत्तर द्यावे. भारतीय किसान सभेचे पत्र त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे, त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. तसेच, CBI, ED, ACB यांच्याकडे याबाबतची सविस्तर तक्रार करणार आहे, धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्ंयामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. बदल्यांसाठीचे रेट कार्ड त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांकडे सापडले आहे, धनंजय मुंडे यांच्याकडे सर्व वाटा जात होता, असा गंभीर दावा आमदार धस यांनी केला आहे.
वाल्मिक कराड हे राज्याचे बाप होते का? सुरेश धस
सुरेश धस म्हणाले, वाल्मिक कराड यांनी निविदा ठरवल्या, वाल्मिक कराड हे राज्याचे बाप होते का? महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती. या सर्वांचे CDR काढा, 100 कोटींपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार यात आहे. वाल्मिक कराड जिल्ह्याचे बाप वाटत होते, मात्र निविदा काढण्यात देखील तो बाप होता असा टोला सुरेश धस यांनी लगावला आहे.





