मंचर : नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या छाननीत 24 उमेदवारांचे अर्ज मंगळवार, दि.18 रोजी बाद झाले आहेत. त्यामुळे 17 जागांसाठी 92 तर नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे. अशी माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली. मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व 17 प्रभागासाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्जांची छाननी झाली. नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कुलकर्णी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद जाधव यांच्या उपस्थितीत ही छाननी झाली. छाननीच्या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी योग्य नियोजन करून प्रभागनुसार कार्यकर्त्यांना छाननीसाठी आतमध्ये सोडले. सुरुवातीला नगराध्यक्ष व त्यानंतर प्रत्येक प्रभागानुसार छाननी करण्यात आली.नगराध्यक्ष पदासाठी 9 अर्ज आले होते 2 अर्ज अवैध ठरले असून 6 अर्ज वैध ठरले. 17 प्रभागासाठी तब्बल 114 अर्ज भरण्यात आले होते छाननी मध्ये 22 अर्ज बाद करण्यात आले आहे. 92 अर्ज वैध ठरले आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 83 उमेदवार रिंगणात आहे. निवडणूक निरीक्षक राहुल पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. शिवसेनेच्या चार उमेदवरांना फटका उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शासनाने जीआर काढून पक्षाने एका जागेसाठी दोन उमेदवारांचे अर्ज भरले व त्यातील मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाला अथवा त्यांनी माघार घेतल्यास पर्यायी उमेदवार निवडणूक लढवू शकेल असे सांगितले होते. मात्र छाननी सुरू झाल्यानंतर मंगळवारी नवीन जीआर आला. त्यानुसार डमी उमेदवारांला एक सूचक असल्यास त्याचा अर्ज बाद करण्यात यावा असा आदेश निघाला. याचा फटका बसून शिवसेनेच्या चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले. प्रभाग 8 मध्ये शिवसनेचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी अर्ज भरला होता. डमी म्हणून धनेश बाणखेले यांचा अर्ज होता. गांजाळे माघार घेऊन बाणखेले निवडणूक लढणार होते. मात्र त्यांचाच अर्ज बाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रभाग 5 मध्ये शिवसेनेच्या काजल भेेके तर प्रभाग 11 मध्ये विठ्ठल मोरडे यांचे अर्ज बाद झाले आहे. या संदर्भात दत्ता गांजाळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सदरचा जीआर काल आला असता तर आम्ही एकच उमेदवार दिला असता. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढाविताना एक सूचक दिला जातो त्यामुळे अर्ज बाद झाले. काही ठिकाणी छाननी पूर्ण झाल्यानंतर हा जीआर आल्याचे गांजाळे म्हणाले. तसेच काँग्रेसच्या तीन डमी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांनी दिली.