कोविशील्ड लसीचे प्रकरण पोहोचले सर्वोच्च न्यायालयात, याचिकेत काय म्हंटले आहे जाणून घ्या

COVISHIELD – कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेल्या कोविशील्ड लस इंजेक्शनचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिवारी यांनी आपल्या याचिकेत कोविशील्ड लसीचे दुष्परिणाम आणि धोके तपासण्यासाठी माजी संचालकांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याची मागणी केली आहे. तसेच, हे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हायला हवे, असेही याचिकेत म्हटले आहे. ( side effect of covishield vaccine)
विशाल तिवारी यांनी आपल्या याचिकेत कोविशील्ड लसीचे दुष्परिणाम आणि त्याच्या जोखीम घटकांची तपासणी करण्यासाठी आणि लसीमुळे होणारे नुकसान निश्चित करण्यासाठी केंद्राला निर्देश जारी करण्याची मागणी केली आहे. या याचिकेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, या लसीमुळे जे अपंग झाले आहेत किंवा मरण पावले आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
विशाल तिवारी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, अलीकडेच कोविशील्ड बनवणाऱ्या AstraZeneca या कंपनीने कबूल केले होते की, कोरोनाच्या काळात ज्या लोकांनी Covishield लस घेतली आहे त्यांना दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. कंपनीने कबूल केले होते की हे इंजेक्शन रक्तातील प्लेटलेट्स कमी करण्यासाठी आणि रक्त गोठण्यास कारणीभूत ठरू शकते. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला ॲस्ट्राझेनेकाने ही लस तयार करण्याचा परवाना दिला होता.
विशाल तिवारी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, भारतातील लोकांना या लसीचे सुमारे 175 कोटी डोस देण्यात आले आहेत. कोविड-19 नंतर हृदयविकाराच्या झटक्याने मरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरूणांमध्येही हृदयविकाराच्या अनेक घटना पाहावयास मिळत आहेत. आता, कोविशील्डची निर्माता ब्रिटीश फार्मा AstraZeneca ने ब्रिटनच्या न्यायालयात कबूल केले आहे की त्यांच्या कोविड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. कंपनीने म्हटले होते की, Covishield मुळे रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेट संख्या कमी होऊ शकते. या सर्व बाबी लक्षात घेता, या लसीमुळे लोकांच्या आरोग्याची हानी होत असल्यास सरकारने या प्रकरणी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. युके सह काही देशात या लसीमुळे लोकांच्या आरोग्य धोक्यात आल्यास सरकारकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद असल्याचेही याचिकेत म्हंटले आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोविशील्ड लसीमुळे ह्रदयविकाराने मृत्यू होत असल्याच्या बातम्या येत असल्यामुळे नागरिकांमध्ये काही अंशी भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात आता या याचिकेवर काय सुनावणी होते हे पाहणे महत्वाचे आहे.





