Anil Deshmukh : खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांचा न्यायालयाला अर्ज

मुंबई – मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले (Former Home Minister Anil Deshmukh) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र या अर्जावर येणाऱ्या 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर स्वतः युक्तिवाद केला. मी कारागृहामध्ये चार वेळा चक्कर येऊन पडलो आहे. माझी प्रकृती अद्यापही स्थिर नाही. मला खासगी रुग्णालयात उपचाराकरीता परवानगी देण्यात यावी, अशी विनंती देशमुख यांनी स्वतः न्यायालयासमोर युक्तिवाद करताना केली आहे.
यावर यासंदर्भात तुम्ही कोर्टासमोर लेखी अर्ज करा, असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितले. मात्र त्यानंतर अनिल देशमुख यांच्या वतीने कोर्टासमोर लेखी अर्ज दाखल करण्यात आला. अनिल देशमुख यांनी केलेल्या अर्जावर 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.





