PM Kisan Yojana : 31 लाख शेतकरी होणार बाद? पीएम किसान योजनेत होणार बदल

मुंबई : पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) २१ व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत राज्यातील शेतकरी आहेत. त्यापूर्वी ३१ लाख शेतक-यांवर आसमानीच नाही तर सुलतानी संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. अर्थात केंद्र सरकारने (PM Kisan Yojana) या विषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. याविषयीच्या चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.
केंद्र सरकारनुसार, राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशातील जवळपास ३१.०१ लाख असे लाभार्थी आहेत, जिथे पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ उचलत आहेत. तर नियमानुसार, एक कुटुंबातील पती अथवा पत्नी यातील एकालाच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनाचा लाभ घेता येतो. त्यांच्या खात्यात वार्षिक ६ हजार रुपये जमा होतात. याविषयीच्या काही वृत्तानुसार, केंद्रीय कृषी मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात अर्जांची, ईकेवायसीची पडताळणी सुरू केली आहे. त्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती पीएम किसान निधी योजनेचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे.त्यांची नावं या यादीतून बाद होणार आहे.
३१.०१ लाख प्रकरणातील १९.०२ लाख लाभार्थ्यांच्या कागदपत्रांचा पडताळा पूर्ण झाला आहे. यामधील १७.८७ लाख म्हणजे ९३.९८ टक्के अशी प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात पती आणि पत्नी हे दोघेही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. केंद्रिय कृषी मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाला याविषयीचे पत्र दिले होते. त्यात सर्व लाभार्थ्यांच्या पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले होत. पती, पत्नी अथवा कुटुंबातील इतर सदस्यांना जर या योजनेचा लाभ मिळत असेल, तर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला ६००० रुपयांचा फायदा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





