Apple Farming: लोणी काळभोरच्या उष्ण मातीत बहरले सफरचंद! ८-९ वर्षांपूर्वी रुजवलेल्या बियांपासून फळांनी लगडले झाड
Apple Farming: हिमाचल आणि काश्मीरचे सफरचंद आता महाराष्ट्राच्या मातीत; लोणी काळभोर येथील काळभोर कुटुंबाचा यशस्वी कृषी प्रयोग.

Apple Farming – एरवी थंड हवेच्या प्रदेशात, विशेषतः हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे सफरचंदाचे पीक आता महाराष्ट्राच्या तुलनेने उष्ण हवामानातही बहरू शकते, हे लोणी काळभोर येथील शेतकरी कुटुंबाने प्रत्यक्ष प्रयोगातून दाखवून दिले आहे. सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वी कुतूहलापोटी रुजवलेल्या सफरचंदाच्या एका बियापासून तयार झालेल्या झाडाला आता फळधारणा झाली असून,
फळांनी लगडलेले हे झाड परिसरातील शेतकर्यांसाठी कुतूहल आणि कृषीप्रेमींसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील शेतकरी ज्ञानेश्वर दत्तात्रय काळभोर यांच्या कुटुंबात हा अनोखा प्रयोग साकारला. सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वी घरी खाण्यासाठी आणलेल्या सफरचंदाच्या बियेला कोंब आल्याचे त्यांच्या मुलगी स्नेहल यांच्या निदर्शनास आले. कुतूहलापोटी त्यांनी ही बी कोकोपीटमध्ये रुजविली.
काही दिवसांत बी रुजून त्यापासून छोटे रोप तयार झाले. सुरुवातीला हे रोप मोठ्या कुंडीत लावण्यात आले. सुमारे दोन ते तीन वर्षे कुंडीत त्याची योग्य निगा राखण्यात आली. रोप चांगले वाढून मजबूत झाल्यानंतर ते शेताच्या बांधावर पुनर्रोपित करण्यात आले. योग्य पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर आणि नियमित देखभाल यामुळे झाडाची वाढ चांगली झाली. काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या झाडाला फळधारणा झाली असून, सध्या झाडावर सफरचंदाची फळे पाहायला मिळत आहेत.
“घरी खाण्यासाठी आणलेल्या सफरचंदाच्या बियेला कोंब आल्याने सहज प्रयोग म्हणून तिची लागवड केली. सुरुवातीला हे रोप एवढे मोठे होईल आणि त्याला सफरचंदे येतील, अशी अपेक्षाही नव्हती. मात्र, सातत्याने निगा राखल्याने आज झाडाला फळे आली आहेत. त्यामुळे हा प्रयोग आमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा विषय आहे.”
– ज्ञानेश्वर काळभोर, शेतकरी, लोणी काळभोर





