केंद्र सरकारकडून कौतुकाची थाप

नवी दिल्ली – मुंबईतील धारावीमध्ये करोनाचा प्रभावीपणे सामना करण्यात यश मिळाले आहे. यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेचे कौतुक केले आहे. एक वेळ होती ज्यावेळी मुंबईतील धारावी हा परिसर करोनाचा हॉटस्पॉट होता आणि मोठ्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता करोनाच्या केसेस कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे केंद्राने राज्य सरकार आणि बीएमसीला कौतुकाची थाप दिली आहे.
मुंबईतल्या वाढत्या करोना रुग्णसंख्येला अद्याप ब्रेक लागलेला नसलीा तरी रुग्णसंख्या वाढीचा वेग बराच कमी झाल्याचे चित्र आहे. मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता जवळपास एक महिन्यापर्यंत गेला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर देखील मोठ्या प्रमाणात खाली आला आहे.
मुंबईच्या धारावीमध्ये दाट लोकसंख्या आहे.
धारावीत 2,27,136 व्यक्ती वर्ग किमी असल्याने एप्रिल महिन्यात 12 टक्के ग्रोथ रेटसह 491 केसेस समोर आल्या होत्या. तर डबलिंग रेटचा कालावधी 18 दिवसांचा होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने तातडीने उपाययोजना राबवित परिसरात कंटेन्मेंट झोनच्या नियमांना लागू केले. त्यानंतर ग्रोथ रेट 4.3 टक्क्यांवरुन जूनमध्ये 1.02 टक्के झाला आहे. नियमांची सक्ती केल्याने मे महिन्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 43 दिवस, तर जून महिन्यात तो 78 दिवसांवर गेला आहे.
धारावीसारख्या परिसरात करोनावर नियंत्रण मिळवणे राज्यासह पालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. कारण येथील 80 टक्के लोक हे सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. तसेच दाट वस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे करोनाच प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होण्याचा धोका होता. याशिवाय याठिकाणी प्रभावी होम क्वारंटाईनची व्यवस्था करणे कठिण होते आणि फिजिकल डिस्टंसिंगचं पालन करणेही अवघड होते. परंतु यावर मात करत येथील रुग्णांची संख्या नियंत्रीत ठेवण्यात प्रशासनाने काही प्रमाणात यश मिळविले आहे.
4-टी प्लॅन यशस्वी
बीएससीने धारावीत 4-टी प्लॅन लागू केला होता. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट. त्यानंतर प्रोऍक्टिव स्क्रिनिंगचा निर्णय घेतला. प्रत्येक घरी जाऊन डॉक्टर आणि खासगी दवाखान्यांच्या मदतीने 47,500 लोकांची स्क्रिनिंग केली. 14,970 लोकांचे मोबाईल व्हॅनच्या मदतीने स्क्रिनिंग केले. तर बीएमसी आरोग्य कर्मचाऱ्यांनी 4,76,775 लोकाचे स्क्रिनिंग केले. तसेच स्थानिक वयोवृद्ध आणि हाय रिस्क लोकांच्या तपासणीसाठी फिवर क्लिनिक स्थापन केली. यामुळे जवळपास 3.6 लाख लोकांची स्क्रिनिंग होण्यास मदत झाली. संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटर तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. विशेष म्हणजे 90 टक्के रुग्णांवर धारावीतच उपचार करण्यात आले.





