रूपगंध : उंबरठा

– विजया कदम सातव
‘या घरट्यातून पिलू उडावे, घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती.’ हे शब्द वर्णन आपल्याला घराचं नाही तर उंबरठ्याचंही महत्त्व, त्यातील गोडवा, प्रेम पटवून देतात. नुसत्या मोठ मोठ्या रंगीबेरंगी भिंती बांधून त्यात गोडवा, माणुसकी पेरता येत नाही. त्यासाठी घरातल्या माणसांच्या मनात एक भाव असावा लागतो. एक आतुरता असावी लागते. पूर्वी घर मातीचीच असायची. शेणाने सारवलेल्या घरामध्ये एक सुगंध दरवळत असायचा.
सारवलेल्या घरामध्ये चालतानाही तळपायांना जाणवणारा तो अलगद स्पर्श शरीरात एक ऊर्जा भरायचा. तेव्हाच्या घरात एक संस्कृती होती. ती संस्कृती तो दबदबा, ती मान मर्यादा हे सगळं काही प्रत्येक घराच्या उंबरठ्याशी जोडलं गेलेलं होतं. त्यामुळे प्रत्येक घराचा उंबरठा म्हणजे त्या घराची मर्यादा, इभ्रत, आदर असायचा. गावाकडच्या त्या घरांची बताच न्यारी! जी आजही काही गावांमध्ये टिकून आहे.
पण काळ बदलतोय तसतसा गावातल्या घरांनाही सिमेंटचा लेप चढविला जातोय. त्यातील ‘माती’ही जमीनदोस्त झाली आहे. आज मोठ मोठी घरे आहेत. फ्लॅट आहेत. चकचकीत टाइल्स आहेत. रो बंगलो आहेत. मात्र त्यात केवळ एक त्रिकोणी किंवा चौकोन व्यवहारी कुटुंब वावरताना दिसतात. हे आजच्या घराचं वास्तव आणि भीषण चित्र! अलीकडचा मित्र म्हणजे घर आणि संसार; तर पलीकडचा मित्र म्हणजे जग आणि परमार्थ या दोन्ही मित्रांमध्ये अदबीने आणि सुजनतेने वावरावे लागते. प्रपंचात व परमार्थात योग्य ते संतुलन कसे राखावे. याची शिकवण उंबरठाच देतो. प्रपंचात राहून परमार्थ साधायचा असेल तर उंबरठा कळावा लागतो.
नववधू प्रिया मी बावरते
लाजते पुढे सरते फिरते
घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा उंबरठा म्हणजे मर्यादेचं प्रतीक! त्यातल्या त्यात स्त्रीचे ह्या उंबरठ्याशी आणि घराच्या चौकटीशी ऋणानुबंध असतात. लग्न झाल्यानंतर नववधू घरातील पहिलं पाऊल याच उंबरठ्याच्या साक्षीने टाकते. तिच्यासाठी ते घर म्हणजेच तिचं आयुष्य! या उंबरठ्याच्या आत ती अनेक सुख-दुःखाना सामोरी जायची. त्यानंतर घरातील सासुरवाशीण म्हणून तिला घरातील वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हा उंबरठा ओलांडणे शक्य नसायचे. इतका त्या उंबरठ्याला मान व धाक होता.
लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची
नववधूप्रमाणेच सासरी जाणारी लेक हा उंबरठा ओलांडताना हंबरडा फोडायची. कारण, याच उंबरठ्यावर बसून तिने अनेक खेळ खेळलेले आणि हट्टही धरलेले असायचे. त्यामुळे लग्नानंतरही ती माहेरी आल्यावर तिच्यासाठी उंबरठा म्हणजे आनंदी जगाची सुरुवात असायची. प्रत्येक स्त्रीसाठी उंबरठा म्हणजे एक प्रकारची लक्ष्मणरेषाच असते. माहेरचा उंबरठा ओलांडताना मन कितीही कावरं बावरं झालेलं असलं; तरीही दुसरा उंबरठा स्वागत करण्याकरिता आतुर झालेला असतो. सासरचा तो उंबरठा अनेक जणींना ओलांडता येत नाही. कारण, त्यानंतर स्वागत करण्यासाठी तिसरा उंबरठा नसतो! अनेक स्त्रियांच्या स्वप्नांची राख रांगोळी होते. हे स्त्रीच्या जीवनातील विदारक वास्तव.
घर म्हटलं की वाद आलेच. पूर्वी वाटणीवरून पैशावरून वाद होत. कुणी पुढील शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी जाण्याचा हट्ट धरला जायचा. परंतु पूर्वी गाव आणि घर सोडून जाण्यासाठी घरातील मंडळींचा विरोध असायचा. त्यामुळे नवीन रक्त आणि जुन्या खोडांमध्ये वाद हा व्हायचाच. त्यामुळे अशा अतीतटींच्या प्रसंगावेळी हाच उंबरठा धावून यायचा. ‘लक्षात ठेव एकदा हा उंबरठा ओलांडला तर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील’ या शब्दांत वडीलधार्या माणसांचा संताप पाहून घर सोडून जाण्याचा चंग बांधलेले आपोआप गर्भगळीत व्हायचे.
त्यामुळे अनेकांचे भले व्हायचे. तर काहींचे स्वप्न अपूर्ण राहिले. एके काळी समज होता घराचा उंबरठा ओलांडून जाणे; म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाणं. म्हणून सहजासहजी कुणी घर सोडून जायला धजवत नसे. पण ज्यांनी ज्यांनी मोठ्या हिमतीने, आशीर्वादाने हा उंबरठा ओलांडला त्यांना परत मागे वळून पहायची गरज भासली नाही. ही देखील या उंबरठ्याची खासियत!
परंतु काळाबरोबर सर्वच काही बदलत गेले. लाकडी उंबर्याऐवजी फरशीचा चकाकणारा तुकडा आला. जुन्या पिढीतील हा उंबरा कुठे गेला? ते कळलेच नाही हो! आयुष्याला साहसाने सामोरे जाणारी माणसे मंडळी म्हातारपणात घराचा उंबरठा ओलांडण्याची हिंमतच हरवून बसतात तर देहातून प्राण निघून गेले की ज्याला आपण मृतदेह म्हणतो तो पुन्हा कधीच उंबरठ्याच्या आत घेत नाही असा हा उंबरठ्याचा महिमा! तसं पाहिलं तर आज प्रत्येक जण स्वतंत्र आहे. कुणावर कुणाचे बंधन नाही. सकाळी घराबाहेर पडलेले चेहरे रात्री वेळी अवेळी कधीही घरी येतात.
कुणाच्या रागाला सामोरे जावे लागू नये म्हणून सोयीस्कररित्या किल्ल्याही असतात. मात्र, घरातून बाहेर पडताना किंवा घरात येताना सतत दिसणारा हा उंबरठा मात्र सेफ्टी डोअर, मेन डोअरच्या झगमगाटीत कधी मागे पडला कळलचं नाही. आपण कितीही शिकलो, सवरलो, मोठे झालो; तरी आजही मार्बलच्या उंबरठ्याला नमस्कार करून दुकानात पहिलं पाऊल टाकणारी मंडळी पाहिली की, वाटतं उंबरठ्याचे लाकूड भलेही बदलले असेल; पण उंबरठा मात्र आजही जिवंत आहे. या जिवंतपणाशी साधलेला हा संवाद उंबरठ्यावर समर्पित!





