‘अपूर्वा नेमळेकर’चा पुन्हा एकदा अनोखा अंदाज; आगामी सिनेमात साकारणार ऐतिहासिक भूमिका

मुंबई – अभिनेत्री ‘अपूर्वा नेमळेकर’च्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील भुमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तिची शेवंता नावाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. छोट्या मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळेच तिच्या रूपाचे दिवाने झाले होते.
मात्र, ती मालिका संपली त्यानंतर अपूर्वा बिग बॉस मराठीच्या घरात दिसून आली होती. बिग बॉस मराठी सीजन 4 मध्ये अपूर्वाचा एकदम हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मग ती टास्कविषयी चर्चा असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो या सगळ्यात अपूर्वाचा मोठा सहभाग दिसून आला.
दरम्यान, आता ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये धुमाकूळ घालून प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अपूर्वा नेमळेकर. लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत फॅन्सला ही आनंदाची बातमी दिली आहे. अपूर्वा ‘रावरंभा’ या आपल्या आगामी चित्रपटात आरस्पानी सौंदर्य आणि धारदार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची ‘शाहीन आपा’ ही भूमिका साकारणार आहे.
येत्या 12 मे रोजी इतिहासातील हे मोरपंखी पान रसिकांसमोर उलगडणार आहे. इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.
दरम्यान, आपल्या भूमिकेविषयी अपूर्वा म्हणाली… ‘ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मला स्वतःलाही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिले आहे’. असं अभिनेत्री म्हणाली आहे.





