Kangana Ranaut : माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू ! सोनिया गांधींवर टीका करणं कंगना पडणार महागात; कॉंग्रेसचा थेट इशारा

Kangana Ranaut | Sonia Gandhi : भारतीय जनता पार्टीच्या हिमाचल प्रदेशातील खासदार कंगना राणावत यांनी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या संदर्भात केलेल्या दाव्यांवर कॉंग्रेस पक्षाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी कंगना यांना आरोप मागे घेण्यास सांगितले असून अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.
कंगना यांनी आपले विधान मागे घेतले नाही तर आम्ही मानहानीचा दावा करू. त्यांनी असे विधान कशाच्या आधारे केले? हे अत्यंत दुर्दैवी आहे की त्यांनी सोनिया गांधींच्या उंचीच्या नेत्याविरोधात असे वक्तव्य केले, असे विक्रमादित्य सिंह यांनी म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशला केंद्राकडून येणारा निधी किंवा राज्याकडून येणारा निधी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींना दिला जात आहे आशा आशयाचे विधान कंगना यांनी केले आहे. मात्र यापेक्षा कोणते मूर्खपणाचे विधान असूच शकत नाही.
मी कंगना यांना खुले आव्हान देतो की निधी वळवला असल्याचा १ रुपयाचाही पुरावा त्यांनी दाखवावा किंवा अशा बिनबुडाच्या आरोपांसाठी सोनिया गांधींची माफी मागावी असे विक्रमादित्य सिंह म्हणाले.
हा बौद्धिक दिवाळखोरीचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीने कंगना राणावत यांना अगोदरच सांगितले आहे की संवेदनशील मुद्द्यांवर विधान करू नका. तथापि, असे दिसते आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या हायकमांडच्या सल्ल्याकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही.





