पाळीव प्राणी सोडून न देण्याचे अनुष्काचे आवाहन

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्टारनी आपापल्या फॅन्सना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या करोनामुळे खूप अफवा पसरल्या आहेत. त्यातील एक अफवा म्हणजे पाळीव प्राण्यांमुळे करोना विषाणूची लागण होते, ही अफवाही खूप पसरली होती. विशेषतः कुत्रे किंवा मांजरींमुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव होतो हा अपसमज अनुष्का शर्माने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
कुत्रे आणि मांजरींमुळे करोनाचा प्रसार होत नाही, हे सांगण्यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. आपल्या लाडक्या प्राण्यांना करोनाच्या भीतीने वाऱ्यावर सोडून देऊ नका, असे आवाहन तिने या व्हिडीओमधून केले आहे. अनुष्का पहिल्यापासूनच प्राण्यांबाबत खूप जास्त काळजी घेत आली आहे.
तिने प्राणीहक्कांच्या जागृतीसाठी एक मोहीमही चालवली होती. प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या क्रूरतेच्याविरोधात आवाज उठवण्यासाठी ती विशेष आग्रही होती. पाळीव प्राण्यांमुळे करोनाचा प्रसार होत नाही, हे लोकांना सांगण्यासाठी ट्विंकल खन्नानेही पुढाकार घेतला आहे. प्राण्यांबाबतच्या गैरसमजुतीला हटवून लोकांनी आपल्या प्राण्यांबाबत अयोग्य वर्तन करू नये, असे आवाहन ट्विंकल खन्नानेही केले आहे.





