करोनामुक्त 40 टक्के रूग्णांमधील अँटीबॉडी समाप्त

अहमदाबाद – करोनाची लागण झाल्यानंतर करोनामुक्त झालेल्या तब्बल 40 टक्के रूग्णांच्या शरिरातील अँटीबाडी समाप्त झाल्या असल्याचे एका नव्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. अहमदाबाद येथील महापालिकेने केलेल्या तपासणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. याचाच अर्थ करोनामुक्त झालेल्या या रूग्णांना योग्य खबरदारी घेतली नाही, तर भविष्यात करोना होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अहमदाबाद शहरातील 1800 लोकांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. याबाबत माहिती देताना डॉ. भाविन सोळंकी म्हणाले की, बरे झालेल्या व्यक्तींच्या शरिरातील अँटीबॉडी नाहिशा होणे याचा अर्थ या लोकांना पुन्हा करोना होण्याचा धोका आहे. ही टक्केवारी जवळपास 40 टक्के आहे.
रूग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरिरातील अँटीबॉडी समाप्त व्हायला काही काळ लागतो. मात्र या रूग्णांच्या अँटीबॉडी लवकर नाहीशा झाल्याने त्यांना धोका असल्याचे त्यांनी नमूद केले.
जोपर्यंत करोनावर प्रभावी लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत सोशल डिस्टन्स आणि मास्क वापरण्याची खबरदारी आपल्याला घ्यावीच लागेल असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीत करण्यात आलेल्या एका पाहणीत आणखीनच नवी बाब समोर आली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याच्या अगोदरच्या आठवड्याच्या तुलनेत 35 टक्के नवे बाधित आढळून आले आहेत. त्यात विशेष म्हणजे ज्यांच्या घरात अगोदरच करोना बाधित आढळला होता तेथेच नवे बाधित सापडले असल्याचे निष्पन्न झाले आहे.




