राज्यात आणखी एक ५०० कोटींचा घोटाळा; अजित पवारांवर ठेवलं बोट, अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ

मुंबई : गोवंडी येथे बीएमसीने सार्वजनिक निधीतून तब्बल ५०० कोटी रुपये खर्चून उभारलेले ५८० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय आता खासगीकरणाच्या गर्तेत ढकलले जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवले आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, “हा पूर्णपणे जनतेचा पैसा आणि जनतेची जमीन आहे. तरीही ५८० पैकी फक्त २६४ खाटा गरीब आणि केसरी/पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत, उरलेल्या खाटांवर खासगी रुग्णांवर उपचार करून रुग्णालयाचा व्यवसाय केला जाणार आहे. ही जनतेच्या मालकीची संपत्ती राजकीय नेते आणि खासगी रुग्णालयांच्या घशात घालण्याची खेळी आहे.”
आता आणि एक ५०० कोटीची हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना ?
शताब्दी हॉस्पिटल हे एक ५८० बेड चे हॉस्पिटल, BMC ने बांधले. विरोध असतांना देखील PPP तत्वाने देण्याचा घाट घातला आणि योगायोगाने ह्यात पद्मसिंह पाटील ह्यांच्या तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट ने bid केले आहे.
ह्याच्याच… pic.twitter.com/H1GejwT3bN
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 17, 2025
अंजली दमानिया यांनी पुढे आव्हान केले की, “आम्ही हा निर्णय रद्द करवण्यासाठी रस्त्यावर उतरू. आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सेवांसाठी कर भरतो, तरीही सार्वजनिक सुविधा खासगी कंपन्यांना देऊन टाकायच्या? हे लोकशाहीला शोभणार नाही.”
या आरोपांवर अद्याप BMC किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटना मात्र याविरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.





